पिंपरी महापालिका दवाखाने

पिंपरी महापालिका दवाखाने

Published on

अपुऱ्या जागेवर रुग्णसेवेचा भार
महापालिकेच्या दवाखान्यांना विस्तारित इमारतींची आवश्यकता

पिंपरी, ता. २२ : महापालिकेच्या रुग्णालयांबरोबरच दवाखान्यांचीही पाहणी ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी केली. त्यामध्ये रुग्णसेवेबाबतचे आढळलेले वास्तव मांडले आहे. बहुतांश दवाखान्यांच्या इमारती चांगल्या असून वैद्यकीय सुविधा उत्तम आहेत. मात्र, काही ठिकाणी जागा कमी असल्याचे दिसून आले. अशा दवाखान्यांसाठी स्वतंत्र जागा किंवा प्रशस्त इमारत असायला हवी, अशी अपेक्षा रुग्ण व नातेवाइकांनी व्यक्त केली. त्याचाच हा आढावा...
---
खिवंसरा पाटील रुग्णालय, थेरगाव

जलद, सुलभ सेवेने
रुग्ण-नातेवाइकांचे समाधान

वाकड : थेरगावच्या गुजरनगर येथील खिवंसरा पाटील अर्थात जुन्या थेरगाव रुग्णालयावरचा ताण नवीन रुग्णालयामुळे कमी झाल्याचे जाणवले. दररोज सरासरी ५० ते ६० जणांची जलद व सुलभ बाह्यरुग्ण तपासणी होते. सकाळी सव्वादहाच्या सुमारास तुरळक असलेली गर्दी हळूहळू कमी झाली. बाराच्या सुमारास अवघे सहा ते सात रुग्ण उरले. तपासणीसाठी पंधरा ते वीस मिनिटांवर इतर कुठेही वेळ लागत नव्हता. केसपेपर, तपासणी आणि झटपट औषधे घेऊन रुग्ण अर्धा तासात बाहेर पडत होते. रुग्णालय आवारात स्वच्छता होती. डॉक्टरदेखील प्रत्येकाला तपासून सल्ले देत होते. रांगविरहित ओपीडीत जलद तपासणी, झटपट औषध वाटप, थंडी-ताप, सर्दी, खोकल्यासारख्या किरकोळ आजारांचे रुग्ण व गरोदर महिलांची नियमित तपासणी, रुग्णांची आस्थेने विचारपूस, हिवताप, डेंगी व मलेरियासदृश लक्षणे आढळल्यास नवीन थेरगाव रुग्णालयात पाठवले जाते.

दवाखान्यात कुठलाही त्रास होत नाही. अधून-मधून मी उपचारांसाठी येत असते. जुना केस पेपर असल्यास पैसे देण्याची गरज लागत नाही. औषधे गुणकारी असतात, लगेच फरक पडतो. सर्वसामान्य रुग्णांसाठी उत्तम सोय आहे.
- लता कसबे, पडवळनगर, थेरगाव

१) दवाखान्यात स्वच्छता : आहे
२) बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर : होते
३) रुग्णांची व्यवस्थित तपासणी ; होते
४) औषधे : दिली जातात
५) सुरक्षा व्यवस्था : आहे
WKD25A09076


काशिद दवाखान्यात
रुग्ण अधिक, सेवाही चांगली

पिंपळे गुरव : पिंपळे गुरव येथील सौ. शेवंताबाई सहादू काशिद दवाखान्यात जागेअभावी रुग्णांचे हाल होतात. रुग्णांना बसायला व शिस्त लावून रांगेमध्ये रुग्णसेवा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची गरज आहे. उभे राहण्यासाठी जागा कमी पडत आहे. रुग्ण साहित्य व इतर आरोग्य विषयक साहित्य ठेवण्यासाठी जागा अडचणीची ठरत आहे. अपूर्ण जागा व रुग्णांना उभे राहण्यास व्यवस्थित जागा नसल्याने अनेक रुग्ण जिन्यातच उभे असलेले दिसले. चप्पल स्टॅन्ड आणि सुरक्षा व्यवस्थाही दिसली नाही. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे असेच मोठ्या जागेची आवश्यकता आहे.

मी मुलाला रुग्णालयात घेऊन आलो आहे. रांगेत उभे राहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कोणता रुग्ण कोणत्या बाजूला जातो हे कळत नसून वाद होतात. कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण आहे. ती वाढवून शिस्त लावण्याची गरज आहे
- अविनाश इंगळे, रुग्णाचे वडील

१) दवाखान्यात स्वच्छता : आहे.
२) बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर : होते
३) रुग्णांची व्यवस्थित तपासणी ; होते
४) औषधे : दिली जातात
५) सुरक्षा व्यवस्था : नाही

PMG25B02618


प्रेमलोक पार्क दवाखाना
इमारती मोकळ्या जागेत,
परिसरात साफसफाईचा अभाव
चिंचवड : प्रेमलोक पार्क येथील दवाखान्यात काही सकारात्मक बाबी आणि काही अडचणी दिसून आल्या. दवाखाना प्रशस्त, मोकळ्या जागेत आहे. डॉक्टर व सर्व कर्मचारी असे सात जण आहेत. रुग्णांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली जाते. पण, दवाखाना परिसरात काहीशी अस्वच्छता होती. साहित्य अडगळीत पडलेले आहे. माहिती फलक फाटलेले आहेत, त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. परिसरातील झाडे-झुडपे, गवत वाढले आहे. कचरा पडलेला दिसून आला.

एक महिन्यापूर्वी दवाखान्यात आले होते. तेव्हा एस्प्रिन गोळी शिल्लक नाही असे सांगितले होते. आताही तेच कारण सांगण्यात आले. डॉक्टर व कर्मचारी चांगले आहेत.
- रामेश्वरी राजा, रुग्ण

१) दवाखान्यात स्वच्छता : काही प्रमाणात आहे
२) बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर : होते
३) रुग्णांची व्यवस्थित तपासणी : होते
४) औषधे : दिली जातात. परंतु काही महत्त्वाची औषधे मिळत नाहीत.
५) सुरक्षा व्यवस्था : नाही

CWD25A01648
--
काळेवाडी दवाखाना
पडक्या व जीर्ण जागेतून रुग्णसेवा
काळेवाडी : महापालिकेच्या काळेवाडी दवाखान्याची परिस्थिती बिकट दिसून आली. मुख्य रस्त्यालगत दवाखाना असूनही प्रथमतः कोणाच्याही नजरेस येत नाही. कारण, ही जागा अतिक्रमणाच्या विळख्यात असून इमारत जीर्ण झालेली आहे. गेली वीस वर्षे साडेतीनशे स्क्वेअर फूट जागेतील दोन खोल्यांमधून रुग्णांना सेवा दिली जाते. दहा बाय दहाच्या जागेत जवळपास एक डॉक्टर, तीन परिचारिका व दोन कर्मचारी, एक मदतनीस असे कर्मचारी बाह्यरुग्ण विभागात असतात. एकमेकांना लागून ठेवलेले टेबल व खुर्च्यांमुळे रुग्णांबरोबरच कर्मचाऱ्यांनाही जागा अपुरी पडत असल्याचे दिसले. डॉक्टरांसह बारा कर्मचारी आहेत. रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी स्वच्छतागृह बांधले आहे. नव्या इमारतीत दवाखाना स्थलांतराची मागणी रुग्ण व नागरिकांनी केली.

रुग्णालयात सर्वच प्रकारचे रुग्ण एकाच ठिकाणी व छोट्याशा जागेत येत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. जागेअभावी रुग्णांना एकाच ठिकाणी जमून रुग्णसेवा घ्यावी लागते. या जागेत असुरक्षितता जाणवते.
- अक्षय निकाळजे, रुग्ण

स्वच्छता : आहे
डॉक्टर : होते
रुग्णांची तपासणी : होती
औषधी : होती
सुरक्षारक्षक : नाही

PNE25V33418
--
प्राधिकरण दवाखाना
समाधानकारक सेवा;
सुविधा वाढीची गरज

रावेत : प्राधिकरण परिसरातील दवाखाना व आरोग्य केंद्रात प्राथमिक सेवा सुरळीत होती. प्राधिकरणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि क्षयरोग निर्मूलन केंद्र आहे. तेथे आवश्यक सुविधा आहेत. दवाखान्यात स्वच्छता होती. बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर होते. रुग्णांची व्यवस्थित तपासणी होत होती. आवश्यक औषधे उपलब्ध होती. सुरक्षा व्यवस्था चांगली आहे. मात्र, अपुऱ्या जागेमुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उभे होते. सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा मोफत व सुलभ होण्यासाठी पालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मात्र, वाढती लोकसंख्या आणि रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची संख्या, औषधांचा साठा व बसण्याची जागा वाढविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मला ताप आला आहे. त्यावरील उपचारासाठी येथे आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून लगेच औषधे दिली. कर्मचाऱ्यांचे सर्वांना सहकार्य मिळते.
- सविता काळे, रुग्ण, प्राधिकरण

दवाखान्यात स्वच्छता : होती
बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर : होते
रुग्णांची व्यवस्थित तपासणी : होते
औषधे उपलब्ध : आहे
सुरक्षा व्यवस्था : आहे

फोटो : जागा सोडणे

---
जाधववाडी दवाखाना
वैद्यकीय सुविधा उत्तम;
पुढील उपचार ‘वायसीएम’
जाधववाडी : गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेतर्फे जाधववाडीत आपला दवाखाना सुरू आहे. माता संगोपन, बाळ व गरोदर माता लसीकरण अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्णांना दाखल करून घेण्याचीही सुविधा आहे. निःशुल्क औषधी आणि वैद्यकीय चाचण्यांची सोय आहे. सोमवार ते शनिवार दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत दवाखाना सुरू असतो. सकाळी अकरा वाजता डॉक्टर नव्हते. त्यांची वेळ दोन वाजेची असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रुग्ण जास्त असल्यास तेवढी खाटांची संख्या नाही. पुढील औषधोपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले जाते. दुपारी दोन वाजता बाह्यरुग्ण तपासण्याची अडचण असून दोनपूर्वी आलेल्या रुग्णांना परत पाठवले जाते.

माझी बायको गरोदर असून तिला ताप आला होता. आम्ही येथे अकरा वाजता आलो असता कर्मचाऱ्यांनी आम्हाला तीन वाजता या असे सांगितले. आता तीन वाजेपर्यंत ताप आणखी वाढला तर काय करायचे?
- धीरज पंडित, रुग्णाचे नातेवाईक

स्वच्छता : आहे,
डॉक्टर होते का : नाही
रुग्ण तपासणी : होते
ओषधे : आहे
सुरक्षा रक्षक : नाही

JDW25A00222
---
मोरेवस्ती दवाखाना
रुग्णांची गर्दी, औषधांची कमतरता
चिखली : मोरे वस्ती येथील दवाखाना सकाळी नेहमीप्रमाणे दहा वाजता सुरू झाला. त्यापूर्वीच रुग्ण रांगा लावून थांबले होते. सव्वादहाच्या दरम्यान डॉक्टर आले. त्यानंतर केसपेपर घेऊन एक एक रुग्णाला आत सोडले जात होते. बहुतांशी रुग्णांना दवाखान्यामध्येच औषध उपचार देऊन घरी सोडले जात होते. मात्र, संपूर्ण औषधे उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना बाहेरून औषध घेण्यासाठी चिठ्ठी दिली जात होती. अरुण संख्या अधिक असल्याने आणि डॉक्टर एकच असल्याने दवाखान्यामध्ये गर्दी अधिक प्रमाणात झालेली दिसत होती.

सरकारी दवाखाना असूनही औषधांची कमतरता आहे. रुग्णांना बाहेरून औषधे घेऊन येण्यास सांगितले जाते. हा चुकीचा प्रकार आहे.
- विजय जरे, रुग्णाचे नातेवाईक

स्वच्छता : आहे
डॉक्टर होते का : होते
रुग्ण तपासणी : होते
औषधे : नाही
सुरक्षा रक्षक : नाही

फोटो : जागा सोडणे
---
किवळे गावातील दवाखान्यात सहकार्याची अपेक्षा

किवळे : महापालिकेच्या किवळे गावातील दवाखान्यात केस पेपरची वेळ सकाळी ९ ते १२ आहे. इतर वेळेत आलेल्या रुग्णांना किरकोळ दुखण्यावरही औषध दिले जात नसल्याचे रुग्ण आणि नातेवाईकांनी सांगितले. दुपारी चारच्या सुमारास एक रुग्ण किरकोळ उपचारासाठी आला त्यावर ‘‘केस पेपरची वेळ संपली आहे’’ असे सांगत त्यांना औषध न देता परत पाठवण्यात आले. दवाखान्यात अर्धा डझनहून अधिक आरोग्य सेवक मात्र हजर होते.
बालकाच्या लसीकरणासाठी आलेल्या एका कुटुंबालाही अशाच कारणास्तव नाकारण्यात आले. ‘‘किवळे परिसरात अनेक कुटुंबे अल्प उत्पन्न गटातील आहेत. किरकोळ आजारांसाठी खासगी डॉक्टरांकडे जाण्याची त्यांची परिस्थिती नसते. अशा परिस्थितीत पालिकेच्या दवाखान्यातूनही सहकार्य न मिळाल्यास रुग्णांची अडचण होते,’’ असे स्थानिकांनी सांगितले.

१) दवाखान्यात स्वच्छता : आहे
२) बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर : होते
३) रुग्णांची व्यवस्थित तपासणी : होते
४) औषधे : दिली जातात
५) सुरक्षा व्यवस्था : नाही

ासंकलन : बेलाजी पात्रे, विजय गायकवाड, मच्छिंद्रनाथ कदम, संदीप सोनार, संजू चव्हाण, प्रकाश बैसाने, अनंत काकडे, संदीप भेगडे, रमेश मोरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com