विद्यार्थ्यांनी कौशल्ये विकसित करावी
नारायणगाव, ता. ५ : ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्ये विकसित केली पाहिजे. स्वतःबद्दल व जगाबद्दल समज वाढविण्यासाठी स्वतःलासुद्धा ओळखायला शिकले पाहिजे,’’ असे प्रतिपादन मानसतज्ज्ञ समुपदेशक प्रा. डॉ. सुषमा भोसले यांनी केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमांतर्गत कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी ‘स्व ओळख’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पैठणकर, सहायक शिक्षक देवेंद्र जोगळेकर, रिमा शेणॉय आदी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आदर केला पाहिजे. स्वतःतील कौशल्ये विकसित करताना स्व ओळख समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःला जाणून घेताना जगाबद्दलची समज वाढते. आपला आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता विकसित व्हायला उपयोग होतो. किशोरवय हे नानाविध स्वप्नांनी रंगलेले असते. खूप मोठी आव्हाने पेलण्याची इच्छा या वयात सगळ्यांच्या मनात सुप्तावस्थेत दडलेली असते. या वयात शारीरिक बद्दल तर होतातच, तसे मानसिक बदलही मोठ्या प्रमाणात होतात. पालकांना आणि मुलांना या वयातील भावनिक विश्व समजून घेणे, त्याला सामोरे जाणे अवघड जाते. या वयातील मुलांच्या विचारांचा आवाका अचानक वाढलेला दिसतो. त्यांना आयुष्यातील वेगवेगळे पैलू नव्याने दिसायला लागतात. व्यक्तीला स्वतःच्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याचे कौशल्य म्हणजे स्व-जाणीव. या कौशल्यामुळे व्यक्तीला स्वतःची आवड-निवड, भावना व वृत्ती यांबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो. त्यामुळे आपल्या पालकांशी सुदृढ संवाद ठेवायला शिकले पाहिजे. चांगल्या सवयी बाळगल्यास भविष्यात त्याचा उपयोग होतो. अभ्यासासोबत अवांतर वाचनाचा छंद सुद्धा जोपासला पाहिजे.’’
या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ एनआयईच्यावतीने शैक्षणिक वर्षात विद्यार्थी उपयुक्त असे विविध उपक्रम राबविले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.