तणनाशकांचा वापर करूनही गवत हिरवेच
पुणे, ता. २८ : शेतीमध्ये तणनाशकांचा वापर हा शेतकऱ्यांसाठी काम सोपे करण्याचा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना तणनाशकांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याची समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. पूर्वीसारखी तण पूर्णपणे नष्ट होत नाहीत, उलट फवारणीनंतर काही दिवसांतच गवत (तण) पुन्हा हिरवेच दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
शेतातील तण काढणे हा श्रम व वेळखाऊ प्रकार असल्याने शेतकरी तणनाशकावर अवलंबून राहतात. कामगारांची कमतरता आणि वाढत्या खर्चामुळे तणनाशकांवर शेतकऱ्यांचा भर असतो. मात्र, हीच तणनाशके कमी परिणामकारक ठरल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा तणनाशकाची फवारणी करावी लागत आहे. यामुळे दोनवेळा पैसा खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. शेतीमध्ये तण हे पिकांच्या वाढीला सर्वात मोठे अडथळे मानले जातात. त्यामुळे शेतकरी तणनाशकांवर भरवसा ठेवतात. पूर्वी एका फवारणीमध्ये तण पूर्णपणे नष्ट होत असे, मात्र मागील काही हंगामांपासून हा परिणाम दिसून येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत शेतकरी सागर मोरे म्हणाले, ‘‘तण काढण्यासाठी फवारणीनंतर आठवड्याभरात फरक दिसायला हवा, पण आता परिणाम अगदीच क्षीण होतो. तण पुन्हा उगवतात आणि शेत स्वच्छ राहत नाही. शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीची कितीदा तक्रार करावी? यामध्ये राज्यकर्त्यांनीही लक्ष घालण्याची गरज आहे.’’
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
शेतात तणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि कामगार भेटत नसल्यामुळे शेतकरी खुरपणीचा खर्च वाचविण्यासाठी तणनाशकांचा वापर करतात. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या तणनाशकांचा तणावर फारसा परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना तणनाशकाची दुबार फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढून आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
फवारणी करताना योग्य प्रमाण, वेळ आणि हवामान यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे अशाप्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत. परंतु, शेतकऱ्यांनी जर तणनाशकाबाबत तक्रारी केल्या तर त्याची योग्य दखल घेतली जाईल.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.