पिंपरी चौपाटी पाहणी
अस्वच्छतेचा कहर
खाताय
उघड्यावरचे जहर
शहरातील चौपाट्यांची स्थिती; काही ठिकाणी स्वच्छता
पिंपरी, ता. ३० ः पिण्यासाठी मोजक्या ठिकाणी जारचे पिण्याचे पाणी, तुटपुंजी स्वच्छता, काही अंशी टापटीप अशी अवस्था शहरातील चौपाट्यांवर आढळून आली. मात्र, बहुतांश ठिकाणी एकाच पाण्यात धुतल्या जाणाऱ्या प्लेटस्; डिश, तवा, कडप्पा किंवा गाडीवरचा पत्रा पुसण्यासाठी एकच कापड; तळण्यासाठी पुन्हा पुन्हा वापरलेले तेल; अस्वच्छता, साचलेले पाणी, काही कचरा, घोंगावणाऱ्या माशा आणि डास, उघडेच ठेवलेले खाद्यपदार्थ असे वातावरण मोठ्या प्रमाणात आढळले. त्यामुळे शहरातील चौपाट्या अथवा खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, हातगाड्या म्हणजे ‘अस्वच्छतेचा कहर, खाताय उघड्यावरचे जहर’ अशीच म्हणण्याची वेळ आली.
पावसाळ्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्यामुळे विषबाधा, अपचनासह आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. अशा पदार्थांमध्ये फास्ट फूडचा अधिक समावेश असतो. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेहाचाही धोका होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सामोसे, कचोरी, वडापाव, पिझ्झा आदी पदार्थांचा समावेश धोकादायक पदार्थांमध्ये केला आहे. शिवाय, पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून प्यावे, उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन महापालिका आरोग्य व वैद्यकीय विभागाने केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रातिनिधिक आठ चौपाट्या आणि त्यांच्या परिसराची ‘सकाळ’ने पाहणी केली. त्यात स्वच्छतेविषयीचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसवलेले आढळले. त्याचा हा ऑंखोदेखा लेखा-जोखा..
फास्ट फूडचे दुष्परिणाम
- हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या समस्या येऊ शकतात
- लठ्ठपणा वाढून दमा, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
- रक्तातील साखर आणि चरबीचे प्रमाण वाढते
- बद्धकोष्ठता व पचनाच्या समस्या उद्भवून नैराश्य येऊ शकते
- अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक
उघड्यावरचे अन्नपदार्थांचे दुष्परिणाम
- अन्न विषबाधा, पचन व इतर आरोग्याच्या समस्या
- उघड्यावरच्या अन्नात बॅक्टेरिया, विषाणू वाढत असल्याने अन्न दूषित होते
- जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि ॲसिडिटीसारख्या समस्या
- रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते
काय करायला हवे
- अन्न झाकून ठेवावे
- स्वच्छता असावी
- शिळे अन्न खाणे टाळावे
- फळे, भाज्या धुवून खाव्यात
- सुरक्षिततेची काळजी घेणे
उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने पोटाचे विविध आजार उद्भवू शकतात. मुळात कोणताही पदार्थ एकदा तळल्यानंतर उरलेले तेल हे फेकून दिले पाहिजे. मात्र, बाहेरचे तळलेले पदार्थ बनविण्यासाठी एकच तेल अनेकवेळा वापरले जाते. तेलावर प्रक्रिया झाल्यामुळे त्याचे ऑक्सिडेशन होते. हे तेल शरिरासाठी अत्यंत घातक ठरते. पावसाळ्यात उघड्यावरचे खाणे टाळलेच पाहिजे. मात्र, एरव्हीदेखील बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे.
- डॉ. अभिषेक करमाळकर
उघड्यावर पदार्थ बनवताना पाणी, कच्चा माल, भाज्या कशा वापरल्या जातात याची शाश्वती नसते. त्यामुळे बाहेरचे व उघड्यावरील पदार्थ खाणे हे नेहमीच टाळले पाहिजे. मात्र, बाहेर खाण्याची कधी वेळ आलीच तर कधीही कच्चे पदार्थ खाऊ नये. शिजवलेले पदार्थ खावेत. पदार्थ शिजवल्यानंतर ते पचायला सोपे जातात. त्यामुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता कमी असते. बाहेर गेल्यावर भूक लागलीच तर नारळपाणी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
- रितिका पोपटानी, आहारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.