पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा एकहाती विजय

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा एकहाती विजय

Published on

जयंत जाधव
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळविली. भाजपने ३२ प्रभागांमधील १२८ पैकी सुमारे ८४ जागी यश मिळविले तर; अपक्ष विजयी झालेल्या एक उमेदवारही भाजप पुरस्कृत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणुकीपेक्षा एक जागा जास्त अशा एकूण ३७ जागा मिळविल्या. भाजपबरोबरील युती ऐनवेळी फिसकटल्याने शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे त्यांना सहा जागांवर समाधान मानावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकेकाळच्या बालेकिल्यात मुसंडी मारत भाजपने २०१७ मध्येच सत्ता मिळविली होती. त्यावेळी भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या तर; एका पुरस्कृत अपक्षासह चार अपक्षांनी पाठींबा दिला होता. यावेळी भाजपचे स्थानिक नेते आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांना आधीपासूनच आत्मविश्‍वास होता. त्यामुळेच ते स्वळाचा नारा देत होते. शिवसेनेला शेवटपर्यंत चर्चेत झुलवत ठेवण्याचे डावपेच भाजपने लढविले. त्यामुळे शिवसेनेला ऐनवेळी स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरला नाही.
या विजयात भाजपचे शहरातील संघटन व नियोजन महत्त्वाचे ठरले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी पक्षप्रवेश देण्यापासून उमेदवारी जाहीर करण्यापर्यंत बारकाईने लक्ष होते. वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या सभा, दिलेले पाठबळ व रसदही महत्त्वाची ठरली. चव्हाण यांनी काही महत्त्वाच्याच पदाधिकाऱ्यांना तीन जानेवारीलाच प्रचार सभेतून कान टोचले. त्यामुळे कुणी नुरा कुस्ती केली नाही.
अजित पवार यांनी निवडणुकीचे बिगूल वाजताच भाजप व शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला. मतांची विभागणी नको म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर मोट बांधली. सुरवातीला भाजपने निवडणुकीच्या तोंडावर २० डिसेंबरला मुंबईत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना, काँग्रेसमधील २२ पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला, यामध्ये १६ माजी नगरसेवक होते. यात ११ राष्ट्रवादी काँग्रेसचे, तीन शिवसेनेचे, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रत्येकी एक नगरसेवक होते. त्यानंतर आमदार लांडगे यांनी २३ डिसेंबरला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश घडवून आणला. अन्य पक्षांतील दिग्गज आपल्या पक्षात घेऊन भाजपला मागणी असल्याचे वातावरण निर्माण करण्यात भाजप यशस्वी झाला.
---

पवार यांच्या टीकेला प्रत्यूत्तर
अजित पवार संपूर्ण निवडणूक काळात पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून होते. अनेक दिग्गज शिलेदार पक्ष सोडून गेलेले असताना त्यांनी जिद्द व चिकाटीने झंझावती प्रचार केला. भाजपच्या भ्रष्टाचारावर अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कडक शब्दांत टीका केली. परंतु; महेश लांडगे यांनी भाषणात व माध्यमांवर त्यांना आक्रमक प्रत्यूत्तरे दिली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रचार सभेत शहरातील विकास कामांचा आढावा घेतानाच पुढे विकास कसा करणार, याचा लेखाजोखा मांडला. अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी प्रत्युत्तर दिले. याचाही फायदा भाजपला निर्विवाद यश मिळण्यात झाला.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com