उमेदवारांच्या स्वागतासाठी ‘फिल्डिंग’
पिंपरी, ता. ७ : निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान ठिकठिकाणी उमेदवाराच्या स्वागताचीही स्वतंत्र तयारी केली जात आहे. एखादा कार्यक्रम, दौरा किंवा प्रचारफेरीला उमेदवार येणार असल्याची माहिती मिळताच समर्थकांकडून पद्धतशीर ‘फिल्डिंग’ लावली जाते. स्वागत हा जणू शक्तीप्रदर्शनाचा भाग बनला असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. विशेष म्हणजे हे स्वागत पक्षाकडून नव्हे, तर स्वतः उमेदवार किंवा त्यांचे निकटवर्तीय समर्थकांच्या खर्चातून घडवून आणले जाते.
प्रचार फेरी दरम्यान उमेदवार प्रभागात येणार म्हटल्यावर तेथील नागरिक उपस्थित असायला हवेत. त्यासाठी उमेदवाराच्या स्वागताच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खर्च करून वातावरण तयार केले जाते. हे नियोजन उमेदवाराचे निकटवर्तीय करीत असल्याचे दिसून येते. सध्या अशा प्रकारचे स्वागत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, रुपीनगर, निगडी, आकुर्डी, चिंचवड, रावेत, पुनावळे, पिंपरी, वाकड, ताथवडे, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, दापोडी, कासारवाडी, दिघी, बोपखेल, मोशी, भोसरी आदी भागात पाहायला मिळत आहे.
स्वागताच्या ठिकाणी गर्दी दिसण्यासाठी नागरिकांची जमवाजमव करण्यासाठी योग्य नियोजन केले जाते. अगोदरच सर्व तयारी केलेली असते.
आतषबाजी, औक्षण आणि दिखाऊपणाची स्पर्धा
उमेदवाराच्या आगमनासाठी फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजर केला जातो. काही ठिकाणी महिलांकडून औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते. स्वागतासाठी उभारलेले मंच, फुलांचे कमानी, रांगोळ्या यामुळे परिसर उत्सवमय होतो. मात्र, हा उत्सव निवडणुकीचा की दिखाव्याचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॅनरबाजी आणि ध्वनिक्षेपकांचा मारा
उमेदवाराच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅनर, झेंडे, कटआउट्स उभारले जातात. ध्वनीक्षेपकांवरून जोरजोरात घोषणा, प्रचारगीते आणि भाषणे सुरू असतात. यामुळे संपूर्ण परिसरात कृत्रिम वातावरणनिर्मिती केली जाते. अनेकदा ही बॅनरबाजी आणि ध्वनीक्षेपक नियमांची पायमल्ली करत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
नागरिकांना त्रास, यंत्रणांचे मौन
अनेक ठिकाणी स्वागताच्या नावाखाली वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक गैरसोयी निर्माण होत आहेत. रस्ते अडवून स्वागत, अचानक फटाके, ध्वनी क्षेपकाचा आवाज यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तरीही संबंधित यंत्रणा बहुतांश वेळा बघ्याची भूमिका घेते.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

