मुळशीच्या क्रीडा संकुलात साहित्याची कमतरता

मुळशीच्या क्रीडा संकुलात साहित्याची कमतरता

धोंडिबा कुंभार : सकाळ वृत्तसेवा
पिरंगुट, ता. १० : भरे (ता. मुळशी) येथील तालुका क्रीडा संकुलात क्रीडा साहित्याची कमतरता व जीमची व्यवस्था नाही. येथील संकुलात खेळाडूंच्या निवासाचीही कोणतीही व्यवस्था नाही. या संकुलात मातीच्या आखाड्याचीही गरज आहे.

येथील क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन खासगी व स्थानिक खेळाडूंकडून पाहिले जाते. या व्यवस्थापनासाठी अद्याप कोणतीही आर्थिक तरतूद नाही. व्यवस्थापकाला शासनाचा नेमणुकीचा कोणताही अधिकृत आदेश अथवा पत्र नाही. मात्र तरीही येथील क्रीडा संकुलाची देखभाल स्थानिक असलेल्या खासगी खेळाडूंकडून स्वखर्चाने केली जात आहे. शासनाकडून वीज, पाणी, साफसफाई तसेच अन्य देखभालीचा खर्च मिळत नाही.

व्यायामशाळेची गरज
येथील संकुलात सध्या कुस्ती, कबड्डी, खो-खो, क्रिकेट आणि फूटबॅाल आदी स्पर्धा व खेळ खेळले जातात. हे सगळे खेळही शालेय स्तरावरील होत आहेत. या संकुलात जिमचे कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे हॉल असूनही तालुक्यातील खेळाडूंना जीमच्या व्यायामाला मुकावे लागत आहे.

कामांसाठी निधी खर्च
या तालुका क्रीडा संकुलाच्या कामांचे भूमीपूजन जानेवारी २०१८ साली खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते केले होते. त्यानंतर येथील क्रीडा संकुलासाठी असलेल्या नऊ एकर क्षेत्रापैकी वीस गुंठे क्षेत्रात इनडोअर हॉल (बॅडमिंटन हॅाल) उभारला आहे. त्यावेळी हॉल दुरुस्त करणे, क्रीडांगण समपातळीत करणे, प्लंबिगंची कामे, संरक्षक भिंत, रनिंग ट्रॅक, विद्युतीकरण आदी कामांसाठी ऐंशी लाख पंचाऐंशी हजार इतकी रक्कम खर्च केली गेली आहे.

मुला-मुलींना प्रशिक्षण
हॉलमध्ये मुलींच्या व लहान मुलांच्या कुस्तीचे प्रशिक्षण सुरू आहे. कुस्तीपटू प्रतीक्षा सुतार प्रशिक्षकाचे काम विनामूल्य करीत आहे. दरम्यान, क्रीडा संकुलात आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधीची मागणी आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून केल्याचे सतीश ववले यांनी सांगितले.

पाण्याची व्यवस्था गरजेची
येथील क्रीडा संकुलात गेली सात ते आठ महिने पाणी पुरवठा होत नाही. व्यायामानंतर खेळाडूंना स्वच्छतेसाठी पाण्याची गरज लागते. पिण्यासाठीही पाणी लागते. मात्र येथील संकुलात पाण्याअभावी खेळाडूंचे हाल होत आहे. त्यामुळे या संकुलात पिण्याचे तसेच वापराचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे.


या परिसरात कंपन्या आहेत. या कंपन्यातील कामगार कंपनी सुटल्यावर सुमारे चार वाजण्याच्या सुमारास येथील संकुलाच्या मैदानावर येतात. त्यात अनोळखी तरुणांचे प्रमाण जास्त आहे. आमच्या कुस्ती खेळाच्या सरावावेळी आमच्या महिला खेळाडूही सुमारे चार ते साडे सहा या कालावधीत मैदानावर सराव करीत असतात. मात्र बाहेरून आलेले अनोळखी तरूण मैदानाचा ताबा घेतात. मैदानावर खेळायला आल्यावर अशा अनोळखी तरुणांची नोंदणी येथील क्री़डा संकुलाच्या नोंदवहीत होणे गरजेचे आहे.
- प्रतीक्षा सुतार, कुस्तीपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com