पिरंगुट येथे ४७ वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
पिरंगुट, ता. ११ : ‘‘जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक बाबूराव घोलप हे बहुजनांच्या जीवनाचा पाया आहेत. त्यांच्या त्यागाचा आदर्श घेऊनच शिक्षक आणि विद्यार्थी घडले. शालेय शिक्षणामुळे तुम्ही सर्वजण जीवनात यशस्वी झालात. दिवसरात्र शिक्षकांनी शिकविले, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. विद्यालयाच्या शेतीवर विद्यार्थी आणि शिक्षकांनी नवनवीन प्रयोग राबविले. त्यातूनच जिल्हा पातळीवरील कृषीप्रदर्शनात शाळेच्या शेतीमालाचा प्रथम क्रमांक आला. मुख्याध्यापक व शिक्षकांनी अपार मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे शेतीविषयक ज्ञान घेतले. त्यातूनच आज हे विद्यार्थी उच्च पदांवरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शिक्षण आणि संस्कार यांची सांगड जगण्याला बळ देते.’’ असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी उपसचिव के. के. निकम यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट (ता. मुळशी) येथील पिरंगुट इंग्लिश स्कूल या विद्यालयात १९७७-७८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि संस्थेचा वर्धापन दिन भुकूम (ता. मुळशी) येथील तन मन आयुर्वेदिक केंद्रात नुकताच पार पडला. निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहमेळाव्यास भगवंत वाळूंज, उद्धवराव चव्हाण, गुलाबराव चौधरी, शिवराम गुंजाळ, बिळ्यानिसिद्ध वडेर, मारुती जाधव, नारायण गावडे, चंद्रकांत शितोळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तत्कालीन वर्गशिक्षक गुलाबराव चौधरी यांनी हजेरी घेताना आजोबा झालेले विद्यार्थी ‘यस सर’ म्हणताना सगळेच हास्य कल्लोळात बुडाले होते.
तब्बल सत्तेचाळीस वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आलेले विद्यार्थी शिक्षकांच्या भेटीने आनंदित झाले होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांना संत ज्ञानेश्वरांची मूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. निकम सरांच्या हस्ते माजी विद्यार्थी व त्यांच्या पत्नींना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरविण्यात आले. श्रीकांत शितोळे, शांताराम अमराळे, शोभा राऊत, सखाराम सुतार, आनंदा राऊत, सुभाष सातव, दिलीप पवळे, सतीश गोळे, यशवंत गोळे, शांताराम करंजावणे, संभाजी कुदळे, बाळासाहेब कुदळे, बाळासाहेब क्षीरसागर, बाळासाहेब गरुड, सुदाम गावडे, बाळासाहेब निंबाळकर, शंकर हगवणे, धोंडिबा कुंभार आदींनी यशस्वी संयोजन केले होते. राजेश मारणे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.