आमटे दांपत्यास ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर
पिरंगुट, ता. ३० : सुभाषभाऊ अमराळे सोशल फाउंडेशनतर्फे सुभाषभाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा ‘समाजभूषण’ पुरस्कार समाजसेवक डॅा. प्रकाश आमटे व डॅा. मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला आहे. समाजभूषण पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून रविवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील सुंदरबन कार्यालयात वितरण समारंभ आयोजित केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व माजी खासदार प्रदीप रावत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा होणार आहे. सुभाषभाऊंची ७५ वी जयंती असल्यामुळे विशेष सन्मान म्हणून मुळशी तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा ‘मुळशी भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे तसेच भारतातील एकवीस कर्तृत्ववान महिलांची माहितीही प्रदर्शित केली जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन अमराळे यांनी दिली.

