पांगारे- परिंचे ग्रामस्थांनी पकडले मंगळसूत्र चोरटे

पांगारे- परिंचे ग्रामस्थांनी पकडले मंगळसूत्र चोरटे

Published on

परिंचे, ता. ९ : परिंचे (ता. पुरंदर) परिसरात महिलांना एकट्यांना पाहून मंगळसूत्र, तसेच सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोघांना पांगारे (ता. पुरंदर) येथील तरुणांच्या मदतीने परिंचे पोलिसांनी पकडून अटक केली.
परिंचे गावाजवळील वीर- सासवड रस्त्यावर पोलदरा ही लोकवस्ती आहे. येथे सोमवारी (ता. ८) संध्याकाळी पाच वाजता नर्मदा धर्माजी दुधाळ (वय ७५) या अंगणातील ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी मोरेश्वर दुधाळ हे रस्त्याच्या कडेला मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी उभे होते. तेव्हा त्याठिकाणी तीन संशयित तरुण उभे होते. त्यांच्या आपापसात गप्पा सुरू होत्या. त्यावेळी दुधाळ यांनी त्यांच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता. मुलांची स्कूल बस आल्यावर मोरेश्वर दुधाळ मुलांना घेऊन घरात गेले की लगेच या चोरट्यांनी नर्मदा दुधाळ यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. नर्मदा दुधाळ यांनी आरडाओरडा केला. लगेच मोरेश्वर दुधाळ यांनी गाडीवरून पाठलाग करण्याला सुरवात केली, पण पंधरा किलोमीटरपर्यंत चोरट्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे ते घरी परतले. तसेच,
पांगारे स्थानक परिसरातून तृप्ती धनंजय काकडे (वय ३२) या शेतातून घरी जात असताना या चोरट्यांनी पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यांनी तातडीने याबाबत गावचे पोलिस पाटील तानाजी काकडे यांना माहिती दिली. त्यांनी परिंचे पोलिस ठाण्याचे हवालदार संदिप पवार यांना खबर देऊन चोरटे हरगुडे गावच्या दिशेने गेले असल्याचे सांगितले. तसेच, पांगारे, खेंगरेवाडी, हरगुडे येथील तरुण व शेतकऱ्यांच्या मदतीने परिंचे पोलिसांनी चोरट्यांना पकडून अटक केली. सोहेल आयुब शेख (वय २३, सध्या रा. येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक, पुणे), प्रशांत विजय गायकवाड (वय २४, सध्या रा. पांडे, ता. भोर) यांना अटक केली, तर हामीद शेख (रा. येवलेवाडी, पुणे) हा पळून गेला.
याबाबत तृप्ती धनंजय काकडे (रा. पांगारे) व मोरेश्वर विनायक दुधाळ (रा. परिंचे) यांनी फिर्याद दिली आहे. या चोरट्यांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, हवालदार विशाल जाधव, संदीप पवार पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com