
जुन्या प्रसुतीशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे : डॉ. गावडे
पौड, ता. १९ : ‘‘भारतातील प्राचीन प्रसूतीशास्त्र हे अतिशय प्रगल्भ होते. बाळंतीण व नवजात बालकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अनेक चांगल्या प्रथा होत्या. पण त्या आधुनिक वैद्यक शास्त्राच्या नावाखाली हळूहळू मोडीत निघताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या प्रसुतीशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास होऊन ते वापरण्याची गरज आहे.’’ असे प्रतिपादन आयव्हीएफ तज्ञ डॉ. गोपालकृष्ण गावडे यांनी व्यक्त केले.
पौड पंचायत समिती आरोग्य विभाग व रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा आरसीसी मुळशी यांच्यावतीने आशासेविकांसाठी घेतलेल्या आरोग्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. गावडे बोलत होते. या वेळी मुळशी तालुका चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश पटेकर, महिला अध्यक्षा सुरेखा कडू, आनंद नगर पुणे येथील सिटी फर्टीलीटी सेंटरचे डॉ. प्रफुल्लकुमार सुळे, रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडाचे अध्यक्ष डॉ. समीर शास्त्री, रोटरी आरसीसी समन्वयक मीरा भरविरकर उपस्थित होते. गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब शनिवार वाडा आणि मुळशी स्पेशालिटी हॉस्पिटल पिरंगुटच्यावतीने हे प्रशिक्षण झाले.
ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याबाबत अजूनही हव्या त्या प्रमाणात जागरूकता नाही. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे रोटरी क्लबने पुढाकार घेऊन महिलांमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागृती करीत असल्याचे डॉ. समीर शास्त्री यांनी सांगितले. तर भरवणकर म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती व्हायची असेल तर किशोरवयीन मुलींना शालेय कालावधीतच आरोग्य समस्यांची माहिती होण्याची गरज आहे.’’
या प्रशिक्षणात गरोदर स्त्रीची काळजी आणि स्तनदा माता व नवजात बालकाचे आरोग्य याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आरोग्य विभाग समन्वयक राहुल तायडे यांनी सूत्रसंचालन तर आभार आशा लांडगे यांनी मानले. शिबीराचे नियोजन आरसीसी प्रमुख सागर शिंदे, सचिव शहाजी भोसले, सदस्य नवनाथ बोडके, मुळशी स्पेशालिटी हॉस्पिटलचे समन्वयक ज्ञानेश्वर, विशाल निंबाळकर, सुनीता कारले यांनी केले.