दीड महिन्यांपासून प्रश्‍न प्रलंबित

सहायक अधिकारीच पाहतात ‘प्रभारी’ काम ; मुळशी तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्याची जागा रिक्त

दीड महिन्यांपासून प्रश्‍न प्रलंबित सहायक अधिकारीच पाहतात ‘प्रभारी’ काम ; मुळशी तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्याची जागा रिक्त

Published on

पौड, ता. ११ : मुळशी तालुक्यातील पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्याचे पद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे सहायक गटविकास अधिकारीच प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. याशिवाय पंचायत समितीत विविध विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अठरा जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे.

मुळशी तालुक्यात गेली दीड वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत. गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी कोरोना आणि त्यानंतरच्या काळात प्रशासकीय कारभार पाहीला. तालुक्यात पर्यटनाच्या विकासासाठी त्यांनी विधायक पावले उचलली. महिलांच्या विविध व्यवसायांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. बचत गटांना छोट्या व्यवसायांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळवून दिला. तथापि एक जूनला त्यांची रायगडमधील माणगाव येथे बदली झाली. त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. गेली दीड महिन्यांपासून ढमाळ या पदाचा कार्यभार पाहत आहेत.

अशा आहेत रिक्त जागा
याशिवाय विस्तार अधिकाऱ्यांच्या तीनपैकी एक जागा रिक्त आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या दोघांना नेमून दिलेल्या गावांसह इतर गावांचा कारभार पहावा लागत आहे. ग्रामसेवकांच्याही पाच जागा रिक्त आहेत. तालुक्याला पशूधन पर्यवेक्षकाच्या सात जागा मंजूर आहेत. त्यामुळे तीन जागा रिक्त आहेत. पंचायत समिती संलग्न पशूधन पर्यवेक्षकांची एकच जागा मंजूर असून तीही सध्या रिक्त आहे. येथे सहायक लेखा अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा वरिष्ठ सहायक पदाच्या प्रत्येकी एक जागा मंजूर असून तिथेही कुणी कार्यरत नाही. प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, माले आणि माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, या प्रत्येक विभागातील कनिष्ठ सहायकाच्या जागाही रिक्त आहेत.

ग्रामस्थांवर हेलपाटे मारण्याची वेळ
पंचायत समितीच्या प्रत्येक विभागात मुळशी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ, शेतकरी विविध कामांसाठी येत असतो. परंतु, गटविकास अधिकाऱ्यांसह अठरा जागा रिक्त असल्याने त्यांचा बोजा कार्यरत असलेल्या इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावर येतो. तसेच राज्य सरकार, जिल्हा परिषदेतील वरिष्ठांनी पाठविलेल्या नोटिसा, आदेशाला उत्तर देताना, अहवाल पाठविताना, आकडेवारी जुळवताना अधिकारी, कर्मचारी यांचा वेळ जातो. परिणामी ग्रामस्थांना हेलपाटे मारण्याची वेळ येते. कामाचा ताण वाढल्याने अधिकारी, कर्मचारी यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीही जडू लागल्या आहेत.

वैयक्तिक लाभाच्या योजना, ग्रामपंचायतीचा कारभार, विविध प्रकारची बिले काढण्यासाठी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ, शेतकरी पंचायत समितीत येत असतात. परंतु, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी मुळशीकरांची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. पंचायत समितीत हेलपाटे मारण्याची वेळ येते. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण येतो. त्यामुळे त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांसह रिक्त पदे तातडीने भरली जावीत.
- अमित कंधारे, माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.