चिमुरड्यांच्या मदतीसाठी सरसावले प्रशासकीय कर्मचारी

चिमुरड्यांच्या मदतीसाठी सरसावले प्रशासकीय कर्मचारी

Published on

पौड, ता. १० : मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांना शालेय साहित्य पुरविण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारीही पुढे सरसावले आहेत. तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचे किट भेट देऊन अधिकारी, कर्मचारी आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. मुळचे शिक्षक असलेले पण स्पर्धा परीक्षा देऊन गटविकास अधिकारी झालेले सुधीर भागवत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मदतीमुळे तालुक्यातील दुर्गम, डोंगरी भागातील सर्वसामान्य खेडूतांच्या मुलांच्या शिक्षणाची वाट सुखकर होणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारमार्फत मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि बूट पुरविले जातात. परंतु दुर्गम डोंगराळ भागातील आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या परिवारातील मुलांना शाळेचे लेखन साहित्य मिळत नाही. परिणामी असे विद्यार्थी आईवडिलांना मदत म्हणून शाळा सोडून देत पडेल ते काम करतात. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यासाठी अनेक सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत.
गटविकास अधिकारी म्हणून सुधीर भागवत यांनी मुळशी पंचायत समितीची सूत्रे हातात घेतली. त्यांच्याकडे मावळ तालुक्याचाही अतिरिक्त चार्ज आहे. मुळचे शिक्षकी पेशातील भागवत यांनी सर्वप्रथम तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीची माहिती घेतली. सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींबरोबर पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी यांनाही त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यासाठी प्रवृत्त केले. अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्या, पेन, पॅड, कंपासपेटी हे साहित्य असलेले शैक्षणिक किट खरेदी करून ते गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे त्यांनी आवाहन केले. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
पंचायत समितीत सध्या मुख्य कार्यालयात ४२ अधिकारी, कर्मचारी असून ६० ग्रामसेवक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने ६८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट देवून आपला वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर तालुक्यातील शिक्षकांनीही आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याच्या निश्चय करीत भागवत यांच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.