

पौड, ता. ३० : मुळशी तालुक्यात रविवारी (ता. २९) रात्री विविध ड्रोन्सनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मध्यरात्रीपर्यंत गावावरून घिरट्या घालणाऱ्या असंख्य ड्रोन्समुळे ग्रामस्थांसह महिलांनाही रात्रभर जागता खडा पहारा करण्याची वेळ आली.
ड्रोन्स उडविण्याच्या कारणांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असले तरी गावोगावचे ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत. त्यामुळे ड्रोन्स उडविणाऱ्यांना शोधून त्यांना कायमची अद्दल घडविणे हे पौड पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
पौड, दारवली, अंबडवेट, भरे, कासारआंबोली, पिरंगुट, लवळे, भूगाव, भुकूम, चांदे-नांदे, घोटवडे, मुगावडे, करमोळी, चाले, कोळवण, काशीग, माले, कोंढावळे, शेरे, मुळशी धरण परिसर तसेच आयटी परिसरातील माण, हिंजवडी, नेरे, जांबे, कासारसाई, मारुंजी, भोईरवाडी आदी परिसरातदेखील रविवारी रात्री अनेक ड्रोन्सच्या घिरट्या ग्रामस्थांना पाहायला मिळाल्या.
काही ठिकाणी अफवांनाही ऊत आला होता. तथापि रविवारी रात्री लवळे फाटा, पिरंगुट येथे अज्ञात ड्रोन उडवणाऱ्याला पौड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. लवळे फाटा येथे ड्रोन उडत असल्याचे नागरिकांनी कळविल्यावर पोलिसांनी लागलीच तपास केला. ज्या हॉटेलवर ड्रोन उतरले तिथे जाऊन कसून चौकशी केली. त्यावेळी ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीने हॉटेलच्या प्रमोशनल ब्रँडिंगसाठी ड्रोन उडवल्याचे सांगितले. पोलिसांनी तो ड्रोन ताब्यात घेतला आहे. तथापि ड्रोन्स आणि चोऱ्या याचा काही संबंध आहे का याबाबत गावोगाव वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे.
नागरिक घर सोडून सार्वजनिक
इमारतीच्या टेरेसवरून, घराच्या पत्र्यावरून ग्रामस्थांना हे ड्रोन्स घिरट्या घालताना दिसत होते. एका एका गावावर तीन ते चार ड्रोन्स घिरट्या घालताना दिसत होते. त्यामुळे गावागावातील ग्रामस्थ घर सोडून सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यापासून गावच्या शिवेपर्यंत रात्रीच्यावेळी लोकांचा जागता पहारा सुरू होता. मध्यरात्री एक वाजेपर्यंत ड्रोन्स गावावरून घिरट्या मारत होते. त्यामुळे गावोगावचे पोलिस पाटील ग्रामस्थांच्या संपर्कात होते.
सगळीकडे भीतीचे वातावरण
ड्रोन्समुळे चोऱ्या होत असल्याचे तसेच शस्त्रास्त्रे घेऊन चोर घरात घुसत असल्याच्या चर्चा गावोगाव आहेत. त्यामुळेच सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. इतर काही जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या काही सर्वेच्या माध्यमातून महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने ड्रोन्स फिरले जात असल्याच्या वार्ता सोशल मीडियावर पसरल्या आहेत. तथापि मुळशी तालुक्यात अशाप्रकारे सर्वेचे कोणतेही पत्र आमच्याकडे आलेले नाही, असे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.
झोपा उडविणाऱ्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प
तालुक्यातील काही राजकीय मंडळी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासक असल्याने सदस्य मंडळीही शांत झाली आहेत. त्यामुळे लोकांच्या झोपा उडविणाऱ्या या गंभीर प्रश्नांवर खासदार, आमदार इतर आजीमाजी लोकप्रतिनिधीही गप्प आहेत. वास्तविक लोकप्रतिनिधी, महसूल आणि पोलिस प्रशासन यांनी एकत्र येऊन ड्रोन्सचा हा प्रश्न त़डीस नेण्याची आवश्यकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.