पौडमध्ये पोषण आहार किटचे वाटप
पौड, ता. १० : लुपिन ह्यूमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनच्यावतीने मुळशी तालुक्यातील कुपोषित बालके आणि क्षयरोग बाधित रुग्ण यांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त तालुका आरोग्य विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या सहकार्याने पौड (ता. मुळशी) येथील पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात वाटप केले.
राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लुपिनच्यावतीने गेल्या एक वर्षांपासून तालुक्यातील अंगणवाडीतील कुपोषित बालक, तसेच क्षयरोगबाधित रुग्णांना सातत्याने पोषणयुक्त सकस आहार वितरित करून त्यांचे आरोग्य सशक्त व निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याही वर्षी तालुक्यातील ५० कुपोषित बालकांना, तसेच ६० क्षयरोग बाधित रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले गेले. तसेच आरोग्य विभागाला १० बीपी मशिन देण्यात आल्या.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी धनराज गिरम, लुपिन फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक संदीप झणझणे, लुपिन कंपनी नांदेचे मानव संसाधन विभागाचे विशाल कुलकर्णी, प्रशासन विभागचे विनोद रासकर, चंद्रविजय हे उपस्थित होते. रोहिणी पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. रूपेश सावंत व संजय धिंदले यांनी नियोजन केले.
4314