जलवाहिनी गाडण्यासाठी ठेकेदाराने खोदला महामार्ग
पौड, ता. ३० ः चांदणी चौकातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्याकडेला जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. शेरे (ता. मुळशी) येथे जलवाहिनी गाडण्यासाठी चक्क महामार्गच खोदला जात होता. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला महामार्ग खोदण्याचे ठेकेदाराचे मनमानी काम ग्रामस्थांनी थांबविले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलजीवन मिशनअंतर्गत भूगावपासून मालेपर्यंत महामार्गाच्या कडेला जमिनीत सुमारे तीन फूट खोल खोदून गाडून जलवाहिनी नेली जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याच्याकडेला सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारवाहिनी खोदली आहे. त्याच्या बाजूने दोन फूट व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. कल्याण टोल यांनी या कामाचा ठेका घेतला असून, त्यांनी ठिकठिकाणी इतर ठेकेदाराने काम दिले आहे.
शेरे येथे एमएसआरडीसीने गटारवाहिनीचे काम केल्यानंतर जलजीवनच्या ठेकेदाराने जलवाहिनी टाकण्यासाठी चक्क महामार्गच खोदला. खोदलेल्या दगडमातीचा ढीग महामार्गावरच लावला. त्यामुळे निम्मा महामार्ग मातीच्या ढिगांनीच अडवला गेला. जेसीबीच्या साहाय्याने हे खोदकाम चाललेले पाहून गावातील ग्रामस्थ शशिकांत ढमाले यांनी याबाबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले. महामार्ग खोदून चाललेले हे काम त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने लागलीच थांबविले. याबाबत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता हे काम थांबविले असल्याचे सांगितले. तसेच, माध्यमांना इतर प्रतिक्रिया देण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे सांगितले.
जलजीवनच्या जलवाहिनीचे काम लवकर आणि चांगल्या दर्जाचे व्हावे, याबाबत ग्रामपंचायत सातत्याने त्या- त्या विभागाकडे लेखी पाठपुरावा करीत आहे. ग्रामस्थही वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सहकार्य करतात. गटरवाहिनीच्या अगोदर जलवाहिनी टाकणे गरजेचे होते. मात्र, महामार्ग खोदून जलवाहिनी टाकण्यास ग्रामस्थ कधीच परवानगी देणार नाही.
- संतोष ढमाले, सरपंच, शेरे
महामार्गाच्याबाहेर गटारवाहिनीजवळ जलवाहिनी टाकण्यासाठी जागा असतानाही ठेकेदाराने महामार्ग खोदला. भविष्यात जलवाहिनीमध्ये काही बिघाड झाल्यास पुन्हा महामार्ग खोदावा लागेल. जागा असताना ही मनमानी कशासाठी. त्यामुळेच ग्रामस्थांनी हे काम थांबविले.
- शशिकांत ढमाले, ग्रामस्थ
04453
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

