तारेच्या कुंपणातून बिबट्याची सुटका
पौड, ता. १४ : वळणे गावच्या नानिवली (ता. मुळशी) येथे शेताच्या लोखंडी तारेच्या कुंपणात पाय अडकलेल्या बिबट्याची दीड तासात सुटका करण्यात आली. वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने बावधनच्या रेस्क्यू टीमने संकटात अडकलेल्या बिबट्याच्या सुटकेचा थरार उपस्थितांनी अनुभवला.
तहसीलदार विजयकुमार चोबे, माजी सभापती रवींद्र कंधारे यांच्या प्रसंगावधानाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. तथापि बिबट्याला पकडल्याने वळणे
पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नर जातीचा चार वर्षाचा हा बिबट्या ६५ ते ७० किलो वजनाचा होता. दरम्यान, सकाळी सव्वा सातच्या दरम्यान वळणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पांडुरंग सातपुते हे शेताकडे चाललेले होते. शेताच्या खळ्याच्या बाजूला उमेश देवधर यांची शेती आहे. त्याच्या तारेच्या कुंपणाला बिबट्या अडकल्याचे सातपुते यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ सरपंच रोहिणी सोंडकर यांचे पती राजेंद्र यांना ही माहिती दिली. त्यांनी रवींद्र कंधारे यांना कळविले. कंधारे यांनी तहसीलदार विजयकुमार चोबे यांना खबर दिली. चोबे यांनी प्रसंगावधान राखत वनविभाग, बावधन येथील रेस्क्यू टीम आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला घटनास्थळी येण्याची सूचना दिली
वनपाल नंदकुमार शेलार, विशाल शेटे, वनरक्षक गणेश धुळशेट्टी, संतोष मुंडे, संतोष भिलारे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रमोद बलकवडे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नेहा पंचमीया आणि त्यांचे सहकारी तत्काळ रेस्क्यू साहित्यासह हजर झाले. वन्यजीव पशुवैद्य डॉ. सात्त्विक पाठक यांनी लांबूनच बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन मारले. २० ते २५ मिनिटात बिबट्या बेशुद्ध पडला बेशुद्ध पडल्यानंतर रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी बिबट्याच्या पायाला अडकलेली तार कटरच्या साह्याने काढली. त्यानंतर त्याला उचलून उपचारासाठी बावधनला नेण्यात आले.
मुळशी तालुक्यात यापूर्वी विविध ठिकाणी बिबट्या आढळून आला आहे. त्याने जनावरांवर हल्ला केला. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तालुक्यात रेस्क्यू टीम वाढविण्याची गरज आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. अफवा पसरवू नये. संपर्क साधल्यानंतर तत्काळ बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी सर्व विभाग तातडीने आले, असे माजी सभापती रवींद्र कंधारे यांनी सांगितले.
04489
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

