सहा महिने उलटूनही आर्थिक मदतीची प्रतिक्षाच!
राहू , ता. १४ : गेल्या सहा महिन्यांपूर्वी दहिटणे (ता. दौंड) येथील परिसरामध्ये एका मेंढपाळाच्या वाड्यावर आईच्या जवळ झोपलेल्या दहा महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला बिबट्याने अलगद उचलून नेऊन त्याचा फडशा पाडला होता. हल्यात अन्वित धुळा भिसे (वय १० महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव. भिसे कुटुंबीय अद्याप (वनविभाग) शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
दहिटणे येथे मेंढपाळ धुळा बाळू भिसे यांचा बकऱ्यांचा वाडा एप्रिल महिन्यात मुक्कामी होता. (ता. २९) एप्रिल रोजी बकऱ्यांच्या वाड्यात अनन्वित आपल्या आईजवळ झोपला होता. पहाटे पाचच्या सुमारास शेजारील ऊस शेताच्या बांधावर दबा धरून बसलेला बिबट्याने अलगद अनन्वितला आपल्या जबड्यात धरून उचलून नेले. मुलाच्या रडण्याच्या आवाजाने भिसे कुटुंबीयांनी बिबट्याच्या मागे धाव घेतली. मात्र, परिसरात असलेल्या उसाच्या शेतात अंधाराचा फायदा घेत बिबट्या मुलाला घेऊन प्रसार झाला. वनविभाग व यवत पोलिस यांच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शेजारील उसात त्या लहान बालकाच्या शरीराचे काही अवशेष आढळून आले होते. पोलिसांनी त्या बालकाच्या शरीराचे अवशेष ताब्यात घेऊन घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले. पुढील काही आनुवंशिक चाचणीसाठी (DNA) नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले. मात्र, अद्याप देखील त्याचा रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना शासकीय मदतीपासून अद्याप वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही होऊन भिसे कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
यवत पोलिसांनी मृत बालकाचे अवशेष ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी ससूनला पाठवले होते. त्यानंतर नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहे. त्याचा अद्याप अहवाल प्राप्त न झाल्यामुळे पुढील कारवाई करता येत नाही. अहवाल प्राप्त झाल्यास तातडीने आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल.
- राहुल काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, दौंड
सहा महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना होती. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हे मेंढपाळ कुटुंबीय अद्याप दुःखातून सावरले नाही. २५ लाख रुपयांची मदत देखील अजून मिळाली नाही.
-शरद कोळपे, उपसभापती, दौंड बाजार समिती
आमचे हातावरचे पोट आहे. आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी, तसेच जंगली प्राण्यांपासून जिवाची पर्वा न करता आम्ही रोज उदरनिर्वाह करतो. शासनाच्या वन विभागाने त्वरित मदत केल्यास आमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळेल.
- धुळा भिसे, मृत अनन्वितचे वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

