राक्षेवाडीच्या नागरिकांकडून दिवाळीच साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राक्षेवाडीच्या नागरिकांकडून दिवाळीच साजरी
राक्षेवाडीच्या नागरिकांकडून दिवाळीच साजरी

राक्षेवाडीच्या नागरिकांकडून दिवाळीच साजरी

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १४ : शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी होताच खेड तालुक्यातील राजगुरुनगरच्या राक्षेवाडीत त्याच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक, मित्रांनी आणि गावकऱ्यांनी मोठा जल्लोष केला. संक्रांतीच्या पूर्वसंध्येलाच राक्षेवाडीकरांनी फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. ‘महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न शिवराज याने साकार केले, आता त्याने ऑलिंपिक जिंकावे,’ अशी आमची इच्छा आहे, अशी भावना त्याचे वडील काळूराम राक्षे आणि आई सुरेखा राक्षे यांनी व्यक्त केली.

शिवराज याने उपांत्य फेरी जिंकल्यावरच राक्षेवाडीत आणि वाडीतील त्याच्या छोटेखानी घरी जल्लोष सुरू झाला. सगळे उत्कंठेने मोबाईल व दूरचित्रवाणीवर अंतिम सामना पाहत होते. त्याने कुस्ती जिंकल्यानंतर एकच जल्लोष झाला. फटाक्यांचे बार निनादू लागले. आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांना शब्द सुचेनात. वडील सातत्याने मोबाईलवरून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. तोपर्यंत मित्र परिवाराने भंडार उधळला. शिवराज याच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. राक्षेवाडीचे ग्रामदैवत असलेल्या ‘वाघोबाच्या नावानं चांगभलं’ अशा घोषणा सातत्याने निनादत होत्या.

शिवराजने कुस्तीसाठी खूप कष्ट घेतले. कुस्तीतील त्याच्या यशासाठी आम्ही आईवडिलांनीही कष्ट घेतले. त्याचे दोन्ही भाऊ युवराज आणि नवनाथ यांनी त्यांचे करिअर सोडून त्याला साथ दिली. त्याला हवे ते पुरविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या यशाने आज आमच्या आयुष्याचे चीज झाले.
- काळूराम राक्षे, शिवराज याचे वडील

‘महाराष्ट्र केसरी’साठी तो चार वर्षांपासून लढत देत होता. पण, यश येत नव्हते. या वेळी आमच्या आशा उंचावल्या होत्या. ग्रामदैवत वाघोबाला मी साकडे घातले होते. पाच दिवस अन्नपाणी जात नव्हते. शेवटी यावेळी त्याला देवाने कष्टाचे फळ दिले. आम्हाला खूप आनंद झाला. सरकारने आता त्याला नोकरी द्यावी, म्हणजे भविष्यातही खेळण्यासाठी त्याला बळ मिळेल.
- सुरेखा राक्षे, शिवराज याची आई

या यशामागे शिवराज याचा त्याग आणि कष्ट आहेत. चौदा वर्षे घर सोडून तो तालमीत मेहनत करीत होता. स्वतःचे जेवण स्वतः बनवून खात होता. वस्तादांनी त्याला चांगले प्रशिक्षण दिले. त्याचा भाऊ नवनाथ स्वतःची प्रॅक्टिस सोडून अडीच तीन वर्षे त्याच्याबरोबर राहिला.
- सौरव सांडभोर, शिवराज याचा मित्र