
राजगुरुनगरच्या अपघातातील दोन गंभीर महिलांचाही मृत्यू
राजगुरुनगर, ता. १४ : पुणे नाशिक महामार्गावर शिरोलीच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना अज्ञात मोटारीने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातातील दोन गंभीर जखमी महिलांचाही मृत्यू झाला. या अपघातात सोमवारी (ता. १३) तीन महिला मृत झाल्या होत्या, मंगळवारी (ता. १४) अजून दोघी मरण पावल्याने आता मृतांची संख्या पाच झाली आहे. राहीबाई पिरप्पा वाघमारे (वय ४५, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) आणि शोभा राहुल गायकवाड (वय ४७, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
पुणे व हडपसर भागातील १७ स्वयंपाकी व मदतनीस महिलांना, सोमवारी रात्री भरधाव अज्ञात मोटारीने चिरडल्याने हा भीषण अपघात झाला होता. या महिलांना बेदरकारपणे चिरडून पळून जाणाऱ्या वाहनाचा मात्र अद्यापही तपास लागलेला नाही. महिलांना चिरडणारे वाहन अपघातानंतर दुभाजकावरून वळून पुन्हा भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने गेले. ते अनेक वाहनचालकांनी पाहिले, मात्र कोणी माहिती देण्यास पुढे येत नसल्याची खंतही अनेकांनी व्यक्त केली.