
कोयते दाखवून दहशत पसरविणाऱ्या दोघांना अटक
राजगुरुनगर, ता. २४ : गाड्या व घराचे दरवाजे फोडत लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना खेड पोलिसांनी कोयत्यांसह अटक केली. साहिल नाशिकेत टाकळकर (वय २०) व प्रतीक दत्तात्रेय टाकळकर (वय २२, दोघे रा. टाकळकरवाडी, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विशाल कोठावळे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगरजवळच्या टाकळकरवाडी, भांबुरेवाडी व ढोरेवाडी परिसरात साहिल व प्रतीक हे दोघेजण गेल्या काही दिवसांपासून चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून गाडीतील लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण करीत होते. एक दिवस रात्री भांबुरेवाडी येथील सत्यवान भांबुरे यांच्या घरी कोयते घेऊन गेले व घराचा दरवाजा तोडून त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली. टाकळकरवाडी येथील एका चारचाकीच्या काचा कोयत्यांनी फोडल्या. या घटनांमुळे या परिसरात लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. खेड पोलीस ठाण्यात तक्रारी येत होत्या. त्यानुसार खेडचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारत भोसले, पोलिस संतोष मोरे, संतोष घोलप, योगेश भंडारे, विजय शेळके, बाळकृष्ण साबळे यांनी सापळा रचून या दोघांना अटक करून त्यांच्याकडील दोन कोयते जप्त केले. अधिक तपास पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे करीत आहेत.