
डॉ. राजेंद्र सिंह यांचे पाडळी येथे मार्गदर्शन
राजगुरुनगर, ता. ४ : दुष्काळ व पूरमुक्त जगाकरिता नावीन्यपूर्ण मॉडेलची निर्मिती करण्यासाठी
राजगुरूनगरजवळील पाडळी गावात (ता. खेड) प्रशिक्षण शिबिर व कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
पाडळी गावातील शिवयोग आश्रमामध्ये ४ ते ६ मार्चदरम्यान डॉर्फ केटल केमिकल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाकडून या शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह ‘जलसहेली’चे डॉ. संजय सिंह, ‘मिशन ५००’चे डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, ‘शिवम् प्रतिष्ठान’चे इंद्रजित देशमुख हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत, असे डॉर्फ केटल केमिकल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख संतोष जगधने यांनी सांगितले. शिबिरात दुष्काळ व पूर मुक्तीवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पाणी प्रश्नाबाबत उपाय योजनांचा ऊहापोह केला जाणार आहे. शिबिर कालावधीत भोसले गुरुजींकडून योग व ध्यानाची सत्रे घेतली जाणार आहेत.