वाहतूक कोंडीतून राजगुरुनगरकरांची कायमची सुटका

वाहतूक कोंडीतून राजगुरुनगरकरांची कायमची सुटका

राजगुरुनगर, ता. २९ : पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरच्या पूर्वेकडून बाह्यवळणाचे काम पूर्णत्वास गेले असून, येथून आता नियमित वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची संपली आहे. यामुळे प्रवासी, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
राजगुरुनगरमधून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर वर्षानुवर्षे वाहतूक कोंडी होत होती. पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण करताना राजगुरुनगरला बाह्यवळण काढण्याचे ठरले. तरी त्यात अनंत अडचणी येत होत्या. शेवटी बाह्यवळण कामांची स्वतंत्र अंदाजपत्रके बनवून त्यांना मंजुरी घेण्यात आली. तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला होता. दरम्यान, जमिनी संपादनात बराच कालावधी गेला. त्यानंतर निविदा व कार्यादेश निघून काम सुरू झाले. ठेकेदार कंपनीने वेळेत काम पूर्ण केले.

चांडोलीत जेथून बाह्यवळण सुरू होते, तेथे मोठा चौक झाला आहे. त्याठिकाणी बाह्यवळणावर ६०० मीटर लांबीच्या भुयारी ''ग्रेड सेपरेटर''चे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाच्या मध्यभागी साडेपाच मीटर उंचीच्या सहा लेन असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जुन्या महामार्गावर दोनशे फूट लांब व शंभर फूट रुंद पूल बांधला आहे. त्यामुळे आता राजगुरुनगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाला कोणताही अडथळा येणार नाही. तसेच पुण्याकडून राजगुरुनगरकडे येणारी वाहने सेवा रस्त्याचा वापर करणार आहेत.

जुना महामार्ग ओस पडला
कोणतेही औपचारिक उद्‌घाटन न होताही, या बाह्यवळणावरून आता नियमित वाहतूक सुरू झाली आहे. प्रामुख्याने भुयारी ''ग्रेड सेपरेटर'' वापरण्यास सुरुवात झाल्यावर राजगुरुनगरमधून जाणारा जुना महामार्ग ओस पडला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे होणारी वाहतूक कोंडी एकदाची संपली आहे.

पुणे-नाशिक महामार्गाला बाह्यवळण झाल्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडी पूर्ण सुटली आहे. बाजार समितीसमोर असलेल्या माझ्या दुकानात चांडोलीकडून येणाऱ्या ग्राहकाला अर्धा तास लागायचा. कोंडीमुळे व्यवसायावर परिणाम व्हायचा, तसेच दिवसभर धूर,धूळ, हॉर्नचे आवाज यांमध्ये सगळे वातावरण प्रदूषित होऊन जायचे. पार्किंग करायलाही ग्राहकाला गैरसोय व्हायची. आता आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
- दिनेश ओसवाल, व्यावसायिक

८७ कोटी रुपये........बाह्यवळणाचा एकूण खर्च
३० महिने.... काम पूर्ततेचा कालावधी


राजगुरुनगर शहर व मंचर शहर बाह्यवळणांची २१६ कोटींची  निविदा २०२० मध्ये जानेवारी महिन्यात निघाली होती. राजगुरुनगर बाह्यवळणाच्या कामाला सप्टेंबर महिन्यात सुरुवात झाली. साधारण ३० महिन्यांत हे काम पूर्ण झाले. राजगुरुनगर बाह्यवळणासाठी सुमारे ८७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
- दिलीप मेदगे, समन्वयक, पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्प

दृष्टिक्षेपात बाह्यवळण मार्ग
* चौपदरी बाह्यवळणाची लांबी ५ किलोमीटर
* लहान मोठी १० बांधकामे, सेवा रस्ते
* विद्युतीकरण आणि वृक्षारोपणाचे काम पूर्णत्वास
* भीमा नदीवर दोनशे मीटर लांबीचे दोन पूल
* पाबळ रस्त्याच्या क्रॉसिंगवर साडेचारशे मीटर लांबीचा मोठा पूल
* वाहनांची वाढीव संख्या लक्षात घेऊन पूल सहापदरी रुंद
* वाफगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ६० मीटर लांबीचा पूल
* चासकमान कालवा, तुकाई मंदिराशेजारील ओढा व टाकळकरवाडी रस्त्यावर पूल

02440, 02439

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com