खेडमध्ये रुपय्या ठरला ‘सबसे बडा’

खेडमध्ये रुपय्या ठरला ‘सबसे बडा’

राजगुरुनगर, ता. २९ : खेड तालुक्यातील मतदारांनी पैसे घेऊन सर्व पक्षाच्या नेत्यांना धडा शिकविला. या धड्यातून सर्वच नेत्यांनी खरोखर आत्मपरीक्षण करावे, असा संदेशच जणू खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाने दिला आहे. पैशाचा अंदाधुंद वापर या निवडणुकीत झाला. जास्त पैसे देणारांना लोकांनी एवढे प्राधान्य दिले की, पैसे वाटप न झाल्याने आमदार दिलीप मोहिते सुद्धा मतांमध्ये मागे राहिले. त्यामुळे खेडच्या राजकारणात ‘सबसे बडा रुपय्या’ हे भीषण आणि लाजिरवाणे वास्तव असल्याचे अधोरेखित झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी सहकार पॅनेलचा विजय झाला. तरी हा विजय साकारताना राष्ट्रवादी काँग्रेसलाही संघर्ष करावा लागला. मागच्या संचालक मंडळातील अंतर्विरोधामुळे आणि कथित भ्रष्टाचारामुळे राष्ट्रवादीच्या पॅनेलला लोळविण्याची नामी संधी असूनही सर्वपक्षीय पॅनेलला ती साधता आली नाही. शिवसेना व भाजप हे पक्ष अजूनही तालुक्याच्या राजकारणाची नस पकडू शकत नाहीत, हे वास्तव समोर आले.
मागच्या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच संचालकांनी, त्यांचेच तेव्हाचे सभापती विनायक घुमटकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत सह्यांचे अधिकार काढून घेऊन अंतर्गत चौकशी समिती नेमली होती. या भ्रष्टाचाराला नाकारत आमदार घुमटकर यांच्या पाठीशी राहिले. लोकांना हे फारसे रुचले नव्हते. त्याचा अंदाज आल्यावर त्यांनी या वेळी घुमटकरांचे तिकीट कापले, तरी त्याचा फटका आमदारांना बसल्याने पॅनेलला विजयासाठी संघर्ष करावा लागला. याउलट एवढा ताकदीचा मुद्दा असतानादेखील विरोधकांना त्याचा पाहिजे तेवढा फायदा घेता आला नाही. हा मुद्दा सोडून ते आमदारांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करीत बसले. त्यामुळे आमदारांचा दरारा कमी करण्यात मात्र त्यांना काहीसे यश आले. आमदारांनी विरोधकांतील अंतर्विरोध चांगला मांडला. नेतेच निवडणुकीपासून पळतात, म्हणजेच त्यांना पराभव होणार हे माहीत आहे, असे सूत्र त्यांनी मांडले. लोकांना ते पटले.
धनदांडग्या उमेदवारांच्या राजकारणाला ऊत आल्याची चिंताजनक परिस्थिती या निवडणुकीत पहावयास मिळाली. ''कार्यकर्ता'' ही संकल्पना खेडच्या राजकारणातून हद्दपार होत असल्याची नांदी या निकालाने दिली. निवडणुकीत निर्णायक मुद्दा पैसा ठरला. प्रत्येकी दहा हजार ते एकवीस हजारांपर्यंत रकमांची पाकिटे दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी मतदारांना वाटली. मतदारांनी सर्वांची पाकिटे स्वीकारली. तरीही काही पडले. याचा अर्थ पैसे घेऊनही मतदारांनी काहीजणांना मते दिली नाहीत. ज्याचे जास्त रकमेचे पाकिट त्याला जास्त मते असा ट्रेंड दिसून आला. त्यामुळे आमदारांसारखा उमेदवार सोसायटी मतदारसंघात सर्वात शेवटच्या नंबरवर गेला.
भगवान पोखरकर, अमोल पवार, विश्वास बुट्टेपाटील यांच्यासारख्या सर्वपक्षीय नेत्यांना क्षमता असताना निवडून आणता आले नाही, याचे खापर फक्त पैसा वाटपावर फोडून चालणार नाही. कारण पैसे तर सगळ्यांनीच वाटले. विरोधक राजकारणात कमी पडतात, हे वास्तव त्यांनी स्वीकारले पाहिजे. फक्त निवडणुकीपुरती नेतेगिरी करणाऱ्यांचे पीक खेड तालुक्यात खूप आहे. शरद बुट्टेंचा अपवाद सोडला तर प्रभावी कार्यक्रम, चळवळ, उपक्रम राबविण्याची कोणाची मानसिकता नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने आमदारांचा फायदा होतो. विरोधकांकडे सक्षम पर्याय दिसत नसल्याने लोक पुन्हा मोहितेंच्या मागे जातात आणि फक्त मोहितेंवर टीका करून आपण जिंकू या मनसुब्याने विरोधक अल्पमतात राहतात, हे येथील राजकारणाचे चक्र आहे. शिवाय एकजुटीने राहण्याची गरज असतानाही, त्यातल्यात्यात एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण होते आणि मग अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येते. अन्यथा बुट्टेंच्या जागेला ताकद लावली असती तर कदाचित आमदारांच्या पराभवाचे लोणीही खायला मिळाले असते. इकडे विलास कातोरे, नवनाथ होले यांच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत बेबनाव कारणीभूत ठरला. आपल्या कार्यकाळात प्रभावी कामगिरी करण्यात या दोघांना यश आले नाही, हेही त्यांच्या पराभवाचे कारण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com