राजगुरुनगरमध्ये महायुतीत महासंग्राम

राजगुरुनगरमध्ये महायुतीत महासंग्राम

Published on

राजगुरुनगर, ता. १७ : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षच एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने नगराध्यक्षपदासाठी आपापले स्वतंत्र उमेदवार आणि नगरसेवकपदांसाठी स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरवले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून फक्त नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे. याठिकाणी नगराध्यक्षपदासाठी ११, तर नगरसेवकपदासाठी १६५ अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी किरण आहेर, शिवाजी मांदळे, मंगेश गुंडाळ, बापू थिगळे, दीपक थिगळे आणि गणेशकुमार इंगवले यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आपापली पॅनेल नगरपरिषद निवडणुकीत उतरवल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चुरस सुरू झाली आहे. महाआघाडी किंवा तिचे घटक पक्ष मात्र या निवडणुकीत आपले उमेदवार देऊ शकले नाहीत. फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवार उभा केला आहे. अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह रॅली नगरपरिषद कार्यालयात येऊन नामनिर्देशन अर्ज दाखल केले. भाजपच्या रॅलीत भोसरीचे आमदार महेश लांडगे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे व पॅनलमधील इतर उमेदवार सहभागी झाले होते. ते येथील हुतात्मा स्मृतीशिल्पस्थळी हुतात्म्यांना अभिवादन करून रॅलीद्वारे अर्ज भरण्यासाठी आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण आहेर आणि नगरसेवकपदांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर उपस्थित होते. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ आणि नगरसेवकपदांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com