खेडमधील खासगी शिकवणी वर्गांची तपासणी

खेडमधील खासगी शिकवणी वर्गांची तपासणी

Published on

राजगुरुनगर, ता. १६ : येथे खासगी शिकवणी वर्गामध्ये सोमवारी (ता. १५) विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याच्या खळबळजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने येथील १८ खासगी शिकवणी वर्गांतील विद्यार्थी सुरक्षा विषयक तपासणी केली.
‌या तपासणीमध्ये अग्निशमन यंत्रणा, स्वतंत्र स्वच्छतागृहाच्या सोयी, सीसीटीव्ही यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्याची व्यवस्था, संगणक यंत्रणा, शिकवणी क्लासमध्ये शिकविणारे शिक्षक व इतर कर्मचारी यांची चारित्र्य प्रमाणपत्र पत्रे, बायोमेट्रिक उपस्थिती, पालकांची संमती पत्रके आदी अनेक बाबींच्या संदर्भात चार पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली.
तपासणीदरम्यान काही क्लासेसमध्ये बऱ्याच सुविधा आढळून आल्या, तर अनेक ठिकाणी संगणक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छतागृहे, अग्निशमन यंत्रणा, पालक समिती पत्रके, उपस्थिती पत्रके आणि कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे आदी बाबींच्या बाबतीत त्रुटी आढळून आल्या. त्रुटी असलेल्या शिकवणी वर्गांना सूचना देण्यात आल्या असून, सुधारणा न केल्यास नोटिस व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पथकांमध्ये पंचायत समिती खेड शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तसेच विषयतज्ज्ञ आणि विशेष शिक्षक यांचा समावेश होता.
राजगुरुनगरबरोबरच ही मोहीम आता संपूर्ण खेड तालुक्यात राबवली जाणार आहे. पालकांमध्ये या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत आहे. नोंदणीकृत शिकवणी वर्गांशिवाय गृहप्रकल्पांमध्ये व काही घरांमध्येही खासगी क्लासेस सुरू आहेत. या वर्गांच्या सुरक्षेचा मुद्दाही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
या घटनेतील संशयित अल्पवयीन मुलास पोलिसांनी बालन्यायमंडळासमोर सादर केले. त्यांनी त्यास बालसुधारगृहात ठेवल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com