राजेगाव परिसराला जोरदार मॉन्सूनची प्रतीक्षा

राजेगाव परिसराला जोरदार मॉन्सूनची प्रतीक्षा

राजेगाव, ता. २ : राजेगाव, खानवटे, मलठण, वाटलूज, नायगाव आणि स्वामी-चिंचोली (ता. दौंड) परिसरामध्ये सर्वजण जोरदार मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. पावसाच्या आगमनापूर्वी शेतातील सर्व कामे उरकण्यात बळिराजा व्यग्र असून खरीपपूर्व हंगामाने गती घेतल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वळवाच्या रूपात वरुणराजाने हजेरी लावली. मात्र, मुसळधार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. पूर्व भागात गेल्या दोन महिन्यापासून वातावरणात प्रचंड उष्णता वाढली असून यंदा तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. यातच आभाळ येत असल्याने उष्णतेची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. यामुळे कधी एकदा वरुण राजा बरसात करतोय याचीच प्रतीक्षा शेतकरी वर्गाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही आहे.
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदीकाठच्या गावांमध्ये आडसाली उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आणि कूपनलिका यांचे पाणी उपलब्ध आहे त्यांनी धोरणबाह्य आडसाली लागवडीला सुरुवात केली आहे.
आडसाली ऊस लागवडीबरोबरच या भागात खरीप हंगामात बाजरी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस ही पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सध्या खरिपातील पिके घेण्यासाठी पेरणीपूर्व मशागतीला वेग आला असून पेरणीसाठी पेरणीयोग्य शेत तयार करण्यात येत आहे.

राजेगाव परिसरातील शेतकऱ्यांना येथील पावसापेक्षाही पुणे परिसरातील धरण साखळीत केव्हा एकदा मुसळधार पाऊस पडतोय याकडे त्याचे लक्ष लागलेले असते. कारण धरण साखळीत जर जोरदार पाऊस झाला तरच भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते आणि वर्षभर या भागातील पाण्याचा प्रश्न मिटून परिसर सुजलाम् सुफलाम् राहतो.
- शरद जगताप, शेतकरी राजेगाव ता. दौंड

00146

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com