कृषी पंप वाचवण्यासाठी धडपड

कृषी पंप वाचवण्यासाठी धडपड

राजेगाव, ता. ११ : गेल्या आठवड्यात सततच्या पावसामुळे दौंड तालुक्यातील पूर्व भागाला वरदान असलेल्या भीमा नदीतील पाणी पातळीत वाढ होऊ होत आहे. यामुळे नदीकिनारी असलेले कृषी पंप सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

उजनी धरणाची पाणी पातळी पाच जून रोजी वजा ५९.९१ टक्के होती. दिवसेंदिवस पाणीपातळीत वाढ होत असून मंगळवारी (ता. ११) टक्केवारी वजा ५५.८८% झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाणी वाढत आहे याचा मनात आनंद जरी असला तरी वारंवार कृषी पंप खाली वर घ्यायला लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी कमी झाले की कृषी पंपाच्या चोरी होऊ लागल्याने सुरक्षिततेसाठी कृषीपंप घरी घेऊन यावे लागले. सुदैवाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भीमा नदीपात्रात पाणी आले की कृषीपंप परत नदीवर घेऊन जावे लागले आणि आता मॉन्सूनच्या मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आले आणि कृषीपंप पाण्यात जाऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
उजनी धरणातील पाणलोट क्षेत्राचे पाणी हे करमाळा, इंदापूर, कर्जत, दौंड, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेले आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदी किनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, देऊळगाव राजे, पेडगाव, वडगाव दरेकर, आलेगाव इत्यादी गावांना उजनीचे पाणी मिळत असल्याने या गावाची शेती सुजलाम्‌ सुफलाम् झाली आहे. हा भाग अंतिम टोकाला (टेल) असल्याने खडकवासला कालव्याचे पाणी या भागात येत नाही. अथवा जरी आले तरी टोकाचा भाग असल्याने या भागात पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यावरच आपली शेती करतो. या गावातील अर्थकारणच उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. या भागात जरी कमी पाऊस पडला तरी चालेल परंतु पुण्याच्या धरण साखळी परिसरातील पावसावरच उजनीचे भवितव्य अवलंबून असते.


यंदा नदीपात्रात पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात कृषीपंप गुंडाळून ठेवावे लागले होते. वर्षभर पोटच्या लेकरासारखे सांभाळलेली पिके डोळ्यासमोर जळताना पहावे लागणार या भीतीने बळिराजा धास्तावला होता. परंतु मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी आल्याने शेतकर्ऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
-बिभीषण यादव, शेतकरी, खानवटे ता. दौंड

00173

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com