गायरानातील अतिक्रमण १० दिवसांत हटविणार

गायरानातील अतिक्रमण १० दिवसांत हटविणार

Published on

राजेगाव, ता. १ ः खानवटे (ता. दौंड) गावात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन आणि रस्ता क्रमांक ४६ खालील बंद पाइपलाइन (गटर मोरी) १० दिवसांत उघडण्याचे तोंडी आश्वासन ग्रामपंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे.
येथील विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष बापूराव झोंड यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. याचिकेत म्हटले होते की, गावात सार्वजनिक वापरासाठी टाकलेली गटार पाइपलाइन काही अतिक्रमणकर्त्यांनी मुरूम टाकून बंद केली आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोत असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी जात नसून, ते माझ्या व इतर ग्रामस्थांच्या घरात व शेतात जात आहे. त्याचा आमच्या दैनंदिन जीवनावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच गावतळे आणि शासकीय गायरान जमिनीवरही बेकायदेशीर अतिक्रमण झाले आहे. याबाबतची रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात झोंड यांनी दाखल केली होती.
तसेच सरकारी वकिलांनी यावेळी माहिती दिली की, २९ सप्टेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायत खानवटे यांना अतिक्रमण काढण्याबाबत पत्र पाठवले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांनी कसलीही दखल घेतली नसून, दिलेल्या पत्राची अंमलबजावणी केलेली नाही.
ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या वकिलांनी न्यायालयात तोंडी आश्वासन दिले की, पुढील १० दिवसांत मुरूम हटवून पाइपलाइनचे तोंड मोकळे केले जाईल. यावर आधारित रिट याचिका निकाली काढत ४ जुलै २०२५ रोजी अंमलबजावणी तपासण्याचा आदेश दिला आहे. झोंड यांच्या वतीने ॲड. ए. व्ही प्रभूणे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. नचिकेत खळदकर यांनी काम पाहिले. तर ग्रामपंचायतीच्या वतीने ॲड. पंकज देवकर यांनी काम पाहिले.

ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण चर्चा करून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.
- अनिल शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी

पूर्वीप्रमाणे जो नैसर्गिक स्रोत होता त्याचप्रमाणे पावसाचे पाणी हे गाव तळ्यातच गेले पाहिजे. त्यामुळे गावातील कोणत्याही नागरिकाला कसलाही त्रास होणार नाही आणि कोणाच्याही घरात किंवा शेतात पाणी जाऊ नये असे आमचे प्रामाणिक मत आहे.
- अशोक पांडूरंग पवार, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com