रावणगावच्या ब्रिटिशकालीन शितफाट्याची दुरवस्था
राजेगाव, ता. ९ ः रावणगाव (ता. दौंड) येथील शिर्सुफळ तलावाच्या भरावाच्या पायथ्यापासून ते रांधवणवस्ती येथील १३ क्रमांकाच्या चारीपर्यंत ब्रिटिशकालीन शितफाट्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पुरेशा दाबाने सिंचनासाठी पाणी येत नाही. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शितफाट्याच्या अस्तरीकरण आणि डागडुजीची तातडीने गरज असल्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
रावणगाव परिसरातील रोटीमल नाल्यावरील ब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावातून निघणाऱ्या शितफाट्यावर रावणगाव आणि परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी यांचे समाजजीवन, अर्थकारण पूर्णतः अवलंबून आहे. रब्बी आणि खरीप हंगामात शितफाट्यास सिंचनासाठी येणारे आवर्तन हे खूप महत्त्वाचे असते.
यापूर्वी जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाने शितफाट्याची दुरुस्ती केली होती. पण ती तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे. यापेक्षा शितफाट्याचे अधिक नुकसान इतर बाबींमुळे झाले आहे. जागोजागी अतिक्रमण झाले आहे. यामुळे शितफाटा काही ठिकाणी नावालाच कागदावर अस्तित्वात राहिला आहे.
नव्वदच्या दशकात याच शितफाट्याद्वारे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खडकी व चिंचोली हद्दीपर्यंत सिंचनासाठी पाणी सोडले जात असे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून या शितफाट्यावर पुरेसे लक्ष दिले जात होते. आता या फाट्यातून फक्त रावणगाव हद्दीपर्यंत सिंचनासाठी पाणी येते. विशेष बाब म्हणजे, १० वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाखालून शितफाटा जाताना महामार्ग रूंदीकरणाच्यावेळी रावणगावहद्दीत तीन ठिकाणी व्यवस्थित काम न झाल्याने आवर्तनासाठी आजही अडथळा निर्माण होतो. ब्रिटिशकालीन १५० वर्षे जुन्या शितफाट्याची कायमस्वरूपी डागडुजी आणि अस्तरीकरणाची तातडीने गरज आहे.
कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांना निवेदन दिले आहे. पुणे येथील सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंताच्या अधिकृत ई- मेलवरही निवेदन पाठवले होते. कृषीमंत्री भरणे यांचे बालपण आणि शालेय शिक्षण रावणगावमध्येच झाले आहे. त्यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या विभागाशी समन्वय साधून शितफाट्याच्या डागडुजी आणि अस्तरीकरणाचे काम मार्गी लावावे. ही रावणगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
- पद्माकर कांबळे, अनिकेत रांधवण, युवा शेतकरी
01391
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.