हिंगणीबेर्डी येथे जेरबंद
राजेगाव, ता. ५ : हिंगणी बेर्डी (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. ५) पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातील शिकार टिपण्यासाठी आलेला बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस नागरी वस्तीत बिबट्याची वरद वाढत चालली आहे. पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याने, हिंगणीबेर्डी येथे मागील पाच दिवसांपूर्वी बिबट्या पकडण्यासाठी शेतकरी हनुमंत गोधडे यांच्या शेताजवळ पिंजरा लावण्यात आला होता. दरम्यान, दौंड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांची संख्या किती हे मात्र समजू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूर्वभागात भीमा नदी किनारी झाडे झुडपे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी खूप जागा आहे. दरम्यान, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. तर हिंगणीबेर्डी, आलेगाव, मलठण व बोरिबेल परिसरात शेतकऱ्यांना बिबटे दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामाला मजूर येण्यास तयार नाहीत. नागरिक व शेतकरी बिबट्याच्या भीतीने सायंकाळी लवकर घराकडे येत आहेत. दरम्यान, वनपरिक्षेत्राधिकारी राहुल काळे यांचा संपर्क होऊ शकला नाही.

