संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीस टाळे
राजेगाव, ता. ९ ः राजेगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकले. विशेष म्हणजे, तहकूब ग्रामसभेमध्ये जमा- खर्चाचा हिशेब विचारला असता, सरपंच आणि ग्रामसेवकाने माहिती देण्याऐवजी सभेतून पळ काढल्याने हा प्रकार घडला.
दरम्यान, सरपंचांनी सर्व आरोप फेटाळले असून, राजकीय कुरघोडीचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. राजेगाव ग्रामपंचायतीत नुकतीच तहकूब ग्रामसभा घेण्यात आली. या सभेपूर्वी नागरिकांनी लेखी अर्ज करून, वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीतील माहिती न मिळाल्याने नागरिक अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा वाढता संताप आणि प्रश्नांची सरबत्ती पाहून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी चालू ग्रामसभेतूनच चक्क पळ काढला. प्रशासनाच्या या पळपुट्या भूमिकेमुळे नागरिकांचा संताप अधिकच भडकला. लोकशाही पद्धतीने चाललेल्या सभेत, हिशेब देण्याऐवजी पळून जाणे हे अत्यंत गंभीर आणि चुकीचे असल्याचा सूर नागरिकांनी व्यक्त केला.
संतापलेल्या नागरिकांनी तत्काळ एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून टाळे ठोकले. नागरिकांनी लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे की, जोपर्यंत त्यांना सन २०२३ ते २०२५ या कालावधीतील संपूर्ण जमा- खर्चाची माहिती मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडले जाणार नाही. या निवेदनावर गटनेते मुकेश गुणवरे, तंटामुक्ती अध्यक्ष शहाजी गुणवरे, मनोज भोसले, राजेश राऊत, दत्ताजी मोघे, महेश कडू, संजय मेंगावडे आदींसह अनेक नागरिकांनी सह्या केल्या आहेत. नागरिकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजेगाव ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना तातडीने माहिती उपलब्ध करून दिली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीची झालेली सर्व कामे रीतसर पद्धतीने आणि वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊनच केलेली आहेत. सर्व व्यवहार पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने केलेले आहेत. ग्रामपंचायतीकडे सर्व हिशोब तयार आहे. मात्र, राजकीय द्वेषातुशतून आणि विरोधासाठी विरोध म्हणून अनेक चुकीचे प्रश्न विचारून ग्रामसभेत गोंधळ घातला.
- ललिता चोपडे, सरपंच, ग्रामपंचायत राजेगाव
ग्रामसभेत ही माहिती समोर यावी आणि खर्चावर चर्चा व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीच्या संपूर्ण जमा- खर्चाचा हिशेब आणि माहिती लेखी स्वरूपात मागितली होती. जेव्हा नागरिकांनी ग्रामसभेत माहिती देण्याची मागणी केली, तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. प्रशासनाने माहिती देण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला.
- मुकेश गुणवरे, गटनेते
01565
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

