रांजणगाव सांडसला दारूबंदीसाठी एल्गार

रांजणगाव सांडसला दारूबंदीसाठी एल्गार

रांजणगाव सांडस, ता. २ : येथील ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारूभट्ट्या कायमस्वरूपी बंद कराव्यात व दारूबंदी करावी, या मागणीसाठी कविता मनोज रणदिवे व रूपाली संभाजी काळभोर या दोन महिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारपासून (ता. ३) बेमुदत उपोषणाला बसणार आहे. त्यांना गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा जाहीर केला आहे.
रांजणगाव सांडस (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैध दारूभट्ट्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, पीडित महिलेला त्यांच्या पतीला व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यासाठी प्रशासनाने सर्व खर्च द्यावा, पीडित महिलांच्या मुलांना संपूर्ण शिक्षणाचा खर्च प्रशासनाने करावा, पीडित महिलेला घर खर्च चालवण्यासाठी लघुउद्योग सुरू करून द्यावा, पीडित महिलेने उपोषणानंतर भविष्यात त्यांच्या जिवाला काही बरे वाईट झाल्यास त्वरित दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, शाळेच्या परिसरात कमीत कमी १०० मीटरमध्ये अवैध धंदे बंद व्हावेत, दारूबंदी करत असताना पीडित महिलांना वेळोवेळी पोलिस संरक्षण द्यावे, आदी मागण्या करत बुधवारपासून उपोषणाला बसण्याचा महिलांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, सोमवारी (ता. १) रांजणगाव येथील पळसपट्टीवरील गणेश मंदिरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिलांना भेटून उपोषण न करण्याची विनंती केली. परंतु महिला उपोषण करण्याच्या मतावरती ठाम आहे. कारण, यापूर्वी अनेक वेळा महिलांनी पोलिस ठाणे व प्रशासनाला लेखी अर्ज, विनंती करूनही दारूबंदी झाली नाही. त्यामुळे उपोषणाच्या मतावर कविता रणदिवे व रूपाली काळभोर या ठाम आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, नाहीतर त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांच्यासह गावातील महिलांनी दिला आहे.

आज दारूबंदी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. रांजणगाव सांडसच्या आसपासच्या गावांनी आम्हाला साथ द्यावी. आमचाही संसार व कुटुंब आनंदी राहण्यासाठी तुमच्या मदतीचा एक हात पुढे करा.
- कविता रणदिवे व रूपाली काळभोर, रांजणगाव सांडस (ता. शिरूर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com