रांजणगाव सांडसला ज्ञानेश्वरी परिष्करण दिनानिमित्त ग्रंथदिंडी
रांजणगाव सांडस, ता. १३ : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री संतराज महाराज विद्यालयातील आणि गावातील भजनी मंडळाच्या वतीने ग्रंथ दिंडी शनिवारी (ता. १३) घेण्यात आली. माजी प्राचार्य डॉ. संजीव लोखंडे यांचे आरोग्य विषयावर व्याख्यान झाले. यावेळी गळ्यात टाळ, खांद्यावर पताका, मुलींनी नऊवारी साडी, डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी गंध लावलेल्या बालवारकऱ्यांच्या ग्रंथ दिंडीने संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’, ‘ज्ञानोबा तुकाराम’ नावाच्या जायघोषाने दुमदुमला होता. ज्ञानेश्वरी परिष्करण दिनानिमित्त ही ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
यासाठी मुलांनी छोटी पालखी तयार केली होती. त्यामध्ये ग्रंथ, तुळशीचे रोप ठेवून वृक्ष संवर्धनाचा विचार पुढे ठेवला होता. रांजणगावातील प्रमुख मार्गावर या ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे विविध फलक गावातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते. विठ्ठल रुक्मिणी यांचा पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधले होते. ग्रंथ दिंडी सोहळा शनी मंदिराच्या पटांगणात येताच विद्यार्थ्यांनी गोल रिंगण केले. मध्यभागी पालखी आणि विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान केलेले बालचूमू उभे होते. शालेय विद्यार्थी, महिलांनी फुगडीचा आनंद घेतला.
याप्रसंगी दत्तात्रेय रणदिवे, संताबापू रणदिवे, संपत रणदिवे, अंजली पाटोळे, संतोष रणदिवे, बाळू रणदिवे, महिंद्रा रणदिवे, पंढरीनाथ रणदिवे, कुंडलिक रणदिवे, मोहन शितोळे, ॲड. प्रकाश शितोळे, रवींद्र शितोळे, गोविंद रणपिसे, पंडित रणदिवे, मोहन शितोळे, सरपंच प्रदीपा रणदिवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संतराज महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जी. रणदिवे, मुख्याध्यापक हिरामण शेलार, देवराव अलभर, बाळासाहेब कोळपे, अर्जुन बिडगर, कैलास दौंडकर, हिराकांत बळीनगर यांनी केले होते. विद्यार्थ्यांना पाटील वाडा ग्रामस्थांनी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.