आदिवासी आश्रमशाळेतील जेवणात अळ्या

आदिवासी आश्रमशाळेतील जेवणात अळ्या

शिनोली, ता. ८ : आदिवासी मुले व मुलींच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार गोहे बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शासकीय आश्रम शाळेमध्ये उघडकीस आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे अंतर्गत प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत २३ शासकीय आश्रमशाळा असून यातील १६ शाळा, शासकीय आश्रमशाळांतील व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचा परिपूर्ण आहार देण्याच्या कार्यक्रमांतर्गत ‘सेंट्रलाइज किचन फॉर आश्रमशाळा’ या योजनेअंतर्गत अन्नपुरवठा करण्यात येतो. हा अन्नपुरवठा स्त्रीशक्ती संस्था विक्रोळी मुंबई व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येतो.
रविवारी (ता. ७) दुपारी १ वाजता सोयाबीनच्या पातळ भाजीत तरंगलेल्या अवस्थेत व सोयाबीनच्या आतमध्ये अळ्या आढळून आल्या. हे जेवण आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांतील शासकीय आश्रमशाळांना पुरवले जाते. आंबेगाव तालुक्यातील राजपूर, आहुपे, असाणे, तेरूंगण, गोहे व इंग्लिश मीडियम घोडेगाव, खेड तालुक्यातील कोहिंडे, चिखलगाव, टोकावडे जुन्नर तालुक्यातील सोमवतवाडी, सोनावळे, आंबे, खटकाळे, अजनावळे, खिरेश्वर, मुथाळणे या सोळा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून अन्न पुरविले जात आहे. सेंट्रल किचनमध्ये जेवण बनविताना त्यावर देखरेख ठेवण्यासाठी दिनेश पाटील व शिंदे या दोन अधिक्षकांची नेमणूक केली असून त्यांच्या माध्यमातून जेवण विद्यार्थ्यांना पाठविले जात आहे. १५ ते २० दिवसाचा भाजीपाला व एक महिन्याच्या कडधान्याचा साठा करून ठेवत असल्याचे सेंट्रल किचनचे व्यवस्थापक संतोष डफळ यांनी सांगितले.
या वर्षी शाळा चालू झाल्यावर सेंट्रल किचनमधून निवासी आश्रमशाळांमध्ये नाश्ता, जेवण पुरविले जात आहे. मात्र नाश्त्यामध्ये मिळणारे पोहे कडक असतात. तसेच चपाती, भात खराब मिळत आहे. याबाबत तोंडी तक्रारी विद्यार्थ्यांनी संबंधित किचन चालकांचे कर्मचारी, आश्रमशाळेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही केल्या. परंतु याबाबत कोणीही आमची दखल घेत नाही व जेवणामध्ये सुधारणा देखील झाली नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

एका स्वयंसेवी संस्थेच्या हातात असंख्य आदिवासी मुलांचा जीव दिला आहे. सेंट्रल किचन सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचा, पालकांचा विरोध आहे. या सेंट्रल किचनमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, तर याची जबाबदारी कोण घेणार? सेंट्रल किचनमध्ये नेमणुकीस असलेले दोन अधीक्षक व जेवण बनविणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी केली आहे.

रविवारी सकाळच्या जेवणामध्ये झालेला हा प्रकार दुर्दैवी असून उद्या याबाबत तातडीची मीटिंग बोलविण्यात आली आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना स्त्री शक्ती संस्थेच्या वरिष्ठांशी दूरध्वनीद्वारे बोलून दिल्या आहेत.
- संदीप पाटील, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com