
कळाशी येथील अपघातात दुचाकीस्वार दांपत्य जखमी
इंदापूर, ता. १ : रात्रीच्या वेळी दुचाकीने ऊसतोड मजुरांच्या तांड्यांवर जाऊन त्यांना भाजीपाला विकून आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या गरीब कुटुंबातील दांपत्य कळासी (ता. इंदापूर) येथे पिकअपची धडक बसल्याने गंभीर जखमी झाले. बबन जनार्धन शेलार व विजया बबन शेलार (रा. अगोती नं. २, ता. इंदापूर), अशी त्यांची नावे आहेत.
शेलार दांपत्य उसाच्या तांड्यावर भाजीपाला विकून आपल्या घराच्या दिशेने येत असताना वरकुटे-गंगावळण रस्त्यावरील कळाशी गावाजवळ भरधाव आलेल्या बोलेरो पीकअपची (क्र. एमएच ४२ एक्यू ०१३०) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक बसली. त्यानंतर मोटारसायकल दूरपर्यंत फरफट नेली. या अपघातात दुचाकीवरील दोघे पती-पत्नी दुचाकीसह पीकअपखाली अडकून पडले होते. अपघात झाल्यानंतर जमलेल्या जमावाने त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यानंतर जेसीबी मशिनच्या साह्याने वाहन बाजूला काढावे लागले. दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही गंभीर इजा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी इंदापूर येथे हलवण्यात आले, मात्र बबन शेलार यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघाताला कारणीभूत असलेल्या संबंधित पिकअप चालकावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.