विजेच्या लपंडावामुळे रब्बी पिके धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या लपंडावामुळे रब्बी पिके धोक्यात
विजेच्या लपंडावामुळे रब्बी पिके धोक्यात

विजेच्या लपंडावामुळे रब्बी पिके धोक्यात

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. १२ : अवकाळी पावसामुळे खरीप पिकांच्या मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, तर अनेक पिके शेतात साचलेल्या पाण्यात सडून गेली होती. मात्र आर्थिक संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांनी जोमाने रब्बी पिकांबरोबर चारा पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. सध्या रब्बीची पिके अगदी जोरदार आली असून, काढणीच्या अंतिम टप्प्यात येऊन पोचली असताना विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने जिरायत भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. वेळोवेळी महावितरण कर्मचाऱ्यांना सांगूनदेखील महावितरण कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतीसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा सुरू असतो. मात्र या आठ तासांतील चार तासदेखील वीज पुरवठा होत नसल्यामुळे पाणी उपलब्ध असूनदेखील विजेअभावी रब्बीच्या ज्वारी, गहू, कांदा तसेच मका व कडवा या चारा पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. वीज कधी येईल आणि कधी जाईल, याचा नियमच राहिला नाही. नियमित वीज पुरवठा होत नसल्याच्या अनेकदा तक्रारी करुनदेखील महावितरणाचे वरिष्ठ अधिकारीदेखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दिवसा ३ दिवस आणि रात्रीचा ४ दिवस वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीचे जिवाची पर्वा न करता पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना साप, विंचू तसेच जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव धोक्यात घालून रब्बी पिके जगण्यासाठी धडपड करीत आहेत. कंपनी, कारखाने यांना २४ तास वीज पुरवठा होत आहे, त्याप्रमाणे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील २४ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
-------------------------------------------
वीज बिल भरण्यासाठी तगादा
मागील आठ दिवसांपासून महावितरणाकडून वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. वीज बिल न भरल्यास तत्काळ विद्युत रोहित्र सोडवण्यात येणार असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
-------------------------------------------
बारामती तालुक्‍यात रब्बी पिकांची स्थिती
---------------------------
ज्वारी - १६,६५३ हेक्टर
गहू - ७,५२४ हेक्टर
हरभरा - ५,२९१ हेक्टर
कांदा - ४,९३२ हेक्टर
सूर्यफूल - २२७ हेक्टर
करडई - २३३ हेक्टर
मका - ८,४८२ हेक्टर
-------------------------------------------
मुबलक पाणीसाठा असूनदेखील विजेअभावी पिके धोक्यात आलेली आहे. लवकरात लवकर नियमित वीज पुरवठा करून द्यावा. त्याचबरोबर रात्रीऐवजी कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करावा म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
- भीमा बनकर, शेतकरी, उंडवडी कडेपठार
-------------------------------------------
माझ्याकडे उंडवडी कडेपठार आणि जराडवाडी ही दोन मोठी गावे आहेत. दोन गावांतून अनेक ठिकाणांहून वीज पुरवठा खंडित झाल्याचे शेतकऱ्यांचे फोन येत असतात. या ठिकाणी मी एकटा महावितरण कर्मचारी असल्याने मला सर्वत्र ठिकाणी पोहचता येत नाही. या ठिकाणी माझ्या सोबतीला एक कर्मचारी मिळाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वेळच्या वेळी सुटतील, याबाबत वरिष्ठांना कळवले आहे.
- सचिन माने, महावितरण कर्मचारी
-------------------------------------------