
इंदापुरातील बेकायदा कत्तलखान्यावर बुलडोझर फिरविण्याची मागणी
इंदापूर, ता.१३ : इंदापूर शहरातील बेकायदा कत्तलखान्यावर कारवाईचा बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करा, अशी मागणी इंदापूर नगरपरिषद व इंदापूर तहसीलदार यांच्याकडे मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी निवेदनाद्वारे केली.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील कसाई गल्लीतील बेकायदा कत्तल खाण्यांवर २३ नोव्हेंबर रोजी धाडसी कारवाई केली होती. त्याचे नागरिकांनी स्वागत केले तसेच नगरपरिषदेचे कौतुक केले होते. त्यानंतर २० जानेवारी व २३ फेब्रुवारी रोजी इंदापूर पोलिसांकडून टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गोमाऊस आढळून आले होते. या दोन्ही वेळेस इंदापूर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. तसेच २० जानेवारी रोजी इंदापूर शहरातील कत्तलखान्यातून गोमांस घेऊन जाणाऱ्या कारवरती भिगवण पोलिसांनी कारवाई केली होती. वरील घटनेवरून नगरपरिषदेने जमीनदोस्त केलेल्या तसेच काही तांत्रिक कारणामुळे कारवाई पासून वंचित राहिलेल्या अवैध कत्तलखान्यातून आजही गाईंच्या कत्तली होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अवैधरीत्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर बुलडोझर फिरवून जमीनदोस्त करावेत, अशी लेखी मागणी केली आहे.