
ग्रामीण भागात डॉक्टरांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी
इंदापूर ता.१८ : ''''माणसाच्या जीवनात वैद्यकीय क्षेत्राला मोठे स्थान आहे. पूर्वी कौटुंबिक डॉक्टर असायचे. हाताच्या नाडी परीक्षणाने ५० टक्के आजार बरा व्हायचा. आता मात्र त्यांची जागा स्पेशालिटी डॉक्टरांनी घेतली आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्यावी,'''' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
इंदापूर येथे झालेल्या एका नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या डोळ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगितला. काही महिन्यापूर्वी मला माझ्या दोन्ही डोळ्यांसंबंधित प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी डॉक्टरांनी मला दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन करायला सांगितले होते. मी म्हणालो, ''आत्ताच करून टाका!'' त्यावर डॉक्टर म्हणाले, एकदम करता येणार नाही. तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवले तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं होणार नाही.'' असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे, बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम.के. इनामदार, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव मगर, इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरचे अध्यक्ष डॉ.एकनाथ चंदनशिवे, श्रीमंत ढोले, डॉ.विठ्ठल शिर्के, डॉ.एकनाथ चंदनशिवे, शिवाजी पवार उपस्थितीत होते.
इंदापूर तालुका हा ग्रामीण भाग असून, ज्या पद्धतीची आरोग्याची सेवा बारामतीमध्ये उपलब्ध आहे. अगदी तशाच पद्धतीची सेवा इंदापूर तालुक्यातील नागरिकांसाठी निर्माण करणे काळाची गरज आहे. याकरिता इंदापूर शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करणे गरजेचे आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत करावी, अशी मागणी आमदार भरणे यांनी
कार्यक्रमात केली.
अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी जातो. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देणे माझ्यासाठी अवघड असते. कारण त्यांना शुभेच्छा दिल्या तर ते रुग्णालय चांगले चालण्यासाठी अनेकजण आजारी पडावे लागतात. त्यामुळे शुभेच्छा देणे अवघड असते. मात्र या रुग्णालयास उद्घाटन करताना शुभेच्छा देण्यास काहीही हरकत नाही कारण हे रुग्णालय अनेकांना दृष्टी देणारे आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
03078