
कॉफीमुक्त परीक्षेसाठी १३ पथकांचा ''वॉच''
इंदापूर, ता.१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १० वी शालांत परीक्षेस आज गुरुवारपासून (ता.२) सुरवात होत आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील १६ परीक्षा केंद्रावर ६ हजार १६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, परीक्षा कॉपी विरहित सुरळीत पार पडाव्यात यासाठी १३ भरारी पथकांची नेमणूक केल्याची माहिती इंदापूर तालुका गट शिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी दिली.
कोरोनाच्या काळानंतर दोन वर्षांनी दहावीची नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेस उद्यापासून सुरवात होत आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
इंदापूर तालुक्यातील नारायणदास रामदास हायस्कूल येथे ७४४, केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी ५३६, श्री शिवाजी विद्यालय बावडा ४०५, भैरवनाथ विद्यालय भिगवन ४७५, छत्रपती हायस्कूल अंथूर्णे ३०७, पळसनाथ माध्यमिक विद्यालय पळसदेव ३१०, हरणेश्वर विद्यालय कळस ४७२, नीलकंठेश्वर विद्यालय लासुर्णे ३६९, नवजीवन विद्यालय पिंपरी बुद्रुक २६४, वालचंद विद्यालय कळंब ३८२, कोंडिराम सदाशिव शिरसागर विद्यालय भिगवन ५४५, एन. एस. हायस्कूल निमसाखर १८६, के.एस.कदम विद्यालय इंदापूर २६२, गुरुकुल विद्या मंदिर गोखळी २९२, एस.बी.पाटील पब्लिक स्कूल वरंगळी ८६, श्री वर्धमान विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज वालचंदनगर ३८३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
दरम्यान, विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे.
-