
तलवारीने केक कापणाऱ्या बिजवडीच्या तरुणावर गुन्हा
इंदापूर, ता. २२ : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बिजवडी (ता. इंदापूर) येथील सचिन दिलीप सातव (वय २८) या युवकावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वाढदिवसाचा केक तलवारीने कापतानाचा सचिन सातव याचा फोटो मंगळवार (ता. २१) सायंकाळी सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याबाबतची माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने पोलिस नाईक सलमान खान, पोलिस कॉन्टेबल नंदू जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे यांना कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सचिन सातव याच्या घरी जाऊन त्याच्याकडे तलवारीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेली लोखंडी तलवार मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून तलवार ताब्यात घेतली व त्यास पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नंदू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे.