उजनीमध्ये घट, दुष्काळाचे सावट

उजनीमध्ये घट, दुष्काळाचे सावट
Published on

इंदापूर, ता. २८ : पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने नोव्हेंबर महिन्यातच उजनी धरणाच्या पाणीपातळीत मोठी घट झाली असून, धरणातील पाणीसाठा ३३ टक्क्यांवर आला आहे. सध्या उजनीमध्ये केवळ १८ टीएमसी पाणी चलसाठ्यात (वापरायोग्य) असून, जानेवारी महिन्यातच धरण कोरडे होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

यावर्षी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात सुरवातीला पावसाने दडी मारली होती. परतीच्या पावसात उजनीमध्ये केवळ ६० टक्के पाणीसाठा झाला. उजनीच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापर्यंत उजनी धरण १०० टक्के हून अधिक भरलेले होते. शंभर टक्के पाणीसाठा जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होता. मात्र, जानेवारीनंतर उजनीच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्याने उन्हाळा अखेरपर्यंत उजनी धरण शंभर टक्के रिक्त होऊन मृतसाठ्यातीलही ३६ टक्के पाणी वापरात आल्याने धरण मोकळे झाले होते. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे उजनी धरणामध्ये उशिराने पाणी साठण्यास प्रारंभ झाला.
मात्र, पाणीसाठा पूर्ववत होत बराच अवधी लागल्याने उजनी धरण केवळ ६० टक्केच भरले. यामधून गेल्या दीड महिन्यात २७ टक्के पाणी साठा वापरात आल्याने आगामी हिवाळा आणि पुढील वर्षीचा भीषण उन्हाळा ३३ टक्के पाण्यामध्ये निभावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गंभीर दुष्काळाची स्थिती
उजनीच्या पाण्याचा सुरवातीपासूनच मोठा वापर सुरू असल्याने गंभीर दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणावर अवलंबून असलेल्या लोकांची वणवण सुरू झाल्यानंतर ऐनवेळी शासन नेमकी कोणती उपाययोजना करणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जुन्या आठवणी
२० वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळात खडकवासला धरणातून दहा टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये सोडले होते. मात्र, सध्या खडकवासला धरणावर अवलंबून असलेल्या शेतीच्या पाण्याच्या आवर्तनातच मोठी तफावत आढळून येत असून, पुणे शहराच्या पिण्याच्या
पाण्याच्या गरजा दररोज वाढत आहेत. या पुढच्या काळामध्ये खडकवासला धरणाचे पाणी शेतीसाठी आणि ऐनवेळी उजनी धरणामध्ये सोडण्यासाठी कितपत मिळू शकेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

योग्य नियोजन गरजेचे
उजनीच्या साठ्यातून रब्बी हंगामाचे आवर्तन आणि भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याबरोबरच कार्तिकी एकादशीनिमित्त नदीपात्रातून पंढरपूरला पाणी सोडण्यात आल्यामुळे या आठवड्यात पाणी साठ्यात कमालीची घट होत तो ३२ टक्क्यांवर आला आहे. उजनी धरणाच्या पाण्याची स्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच पाण्याच्या वापराबाबत अत्यंत जबाबदारी घेऊन काटेकोरपणे पाणी वापर करणे आवश्यक आहे. उजनीच्या पाण्यावर पाणलोट क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. अनेक सहकारी साखर कारखाने, खासगी कारखाने, औद्योगिक वसाहतींनाही उजनीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने उजनीच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन होणे गरजेचे आहे.

धरणाची २६ नोव्हेंबर २०२२ ची स्थिती
एकूण पाणीसाठा- १२३.२८ टीएमसी
जिवंत पाणीसाठा- ५९.६२ टीएमसी
पाण्याची टक्केवारी- १११ टक्के

धरणाची २६ नोव्हेंबर २०२३ ची स्थिती
एकूण पाणीसाठा- ८१.६९ टीएमसी
जिवंत पाणीसाठा- १८.०३ टीएमसी
पाण्याची टक्केवारी- ३३.६५ टक्के

ssociated Media Ids : SHS२३B०५१९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com