जलतरण तलाव म्हणजे काय रे भाऊ?

जलतरण तलाव म्हणजे काय रे भाऊ?

इंदापूर, ता. २९ : राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे समजला जाणाऱ्या इंदापूर तालुक्यामध्ये एकही शासकीय जलतरण तलाव नाही. यामुळे जलतरण तलाव म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न चिमुकल्यांमधून उपस्थित केला जात आहे. जलतरण तलाव नसल्याने ऐन उन्हाळ्याच्या उकाड्यामध्ये तरुणाई, चिमुकले यांना आपला जीव धोक्यात घालून विहीर, तलाव, कालवा, नदी व नाल्यांमध्ये पोहताना पाहायला मिळत आहे.

इंदापूर तालुक्याची लोकसंख्या पाच लाखाहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता संपूर्ण तालुक्यात पोहण्यासाठी एकही शासकीय जलतरण तलाव नाही. त्यामुळे येथील चिमुकले पर्यायी मार्गाचा वापर करताना दिसत आहेत. या पोहण्यावर नियंत्रण नसल्याने अनेकदा चिमुकल्यांनी जीव गमावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. धोकादायक विहिरीत पोहताना अनेक जण १५ ते २० फूट उंचीच्या कठड्यावरून पाण्यामध्ये उडी मारतात. त्यातून अनेक जीवघेण्या घटना घडलेल्या आहेत.

तालुक्यामध्ये एकही जलतरण तलाव नसल्याने तालुक्याच्या उत्तर बाजूला उजनी धरण बॅक वॉटर परिसर तर पूर्वेस भीमा नदी परिसर आहे आणि दक्षिण आणि पश्चिम भागात खडकवासला कालवा आहे. याठिकाणी परिस्थिती अनुरूप चिमुकले पोहण्यासाठी जात असतात. तर अनेक भागात खासगी विहिरी शेततळे यामध्येही चिमुकले जीव धोक्यात घालून पोहतानाचे चित्र पाहायला मिळते. यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कसे निर्माण व्हायचे असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी एवढ्या मोठ्या तालुक्यात किमान मोठ्या गावांमध्ये तरी जलतरण तलाव बांधले जावेत अशी अपेक्षा पोहण्याची आवड असणारे जलतरणपटू पालक यांच्या मधून होत आहे.

तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये जलतरण तलाव व्हावेत.
इंदापूर तालुक्यातील शहरासह निमगाव केतकी, भिगवण, वालचंदनगर, सणसर, बावडा या महत्त्वाच्या आणि मोठी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये जलतरण तलाव निर्माण करण्यात यावेत. या गावांमध्ये किमान एक जलतरण तलाव असल्यास आसपासच्या गावातील मुले पोहण्यासाठी येथे येऊ शकतात. जेणेकरून या भागातील चिमुकल्यांना पोहण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल.

एक वर्षांपूर्वी झाला खासगी जलतरण तलाव परंतु दर मात्र सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर..
गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर तालुक्यात एकही जलतरण तलाव नव्हता मात्र गेल्या एक वर्षभरापूर्वी तालुक्यातील सरडेवाडी येथे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे खासगी जलतरण तलावातील पोहणे हे सर्वसामान्यांसाठी परवडणारे नसून, एका तासाला किमान ५० रुपये ते ७० रुपयांपर्यंत दर आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबातील अनेक चिमुकले पोहण्यासाठी विहीर तलाव व कालव्याचा वापर करतात.

सोसायट्यांमध्येही जलतरण तलावाची वाणवा
इंदापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागात जलतरण तलाव असणारी अद्याप एकही सोसायटी नाही. पुणे, बारामतीसारख्या शहरामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये अनेक जलतरण तलाव आहेत. इंदापूर शहर, भिगवन परिसरामध्ये अनेक सोसायट्यांचे बांधकाम झाले असले, तरी या सोसायट्यांमध्ये अद्याप एकही जलतरण तलाव बांधलेला नाही. यामुळे तेथील चिमुकल्यांची ही कुचंबणा होत आहे.

उजनी धरण बॅक वॉटर परिसर तसेच भीमा नदीचे पात्र यामध्ये अनेक ठिकाणी खळगे तयार झाले आहेत यामुळे त्या ठिकाणी पोहणे साठी जाणे धोक्याचे बनले आहे. तसेच विहिरींमध्ये मनसोक्त पोहण्याचा आनंद घेता येत नाही. यामुळे जर जलतरण तलावाची निर्मिती झाली तर आम्हाला पोहण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल.
-आदित्य कांबळे,विद्यार्थी

इंदापूर शहरातील जलतरण तलावाबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला
असून त्यास मंजुरी मिळालेली आहे. मात्र जलतरण तलावाची नियमित देखभाल दुरुस्ती यासह प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, लोकांचा सक्रिय सहभाग यासाठी किती प्रतिसाद मिळू शकतो यावर माहिती घेऊन लवकरच पुढील कार्यवाही करू -तालुका क्रीडा अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com