इंदापूर शहरातील राजकीय गणिते बदलणार

इंदापूर शहरातील राजकीय गणिते बदलणार

संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. ६ : बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत महत्त्वाच्या असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये इंदापूर तालुक्यातून २५ हजार ९५१ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये इंदापूर शहरातून २ हजार ३९ मताधिक्य मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, शहरातील आजी- माजी नगरसेवक अशी नेत्यांची मोठी फळी असतानाही सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे शहरात पदाधिकाऱ्यांचा हाती घड्याळ, पण सर्वसामान्य मतदारांनी मात्र तुतारी वाजवली. त्यामुळे आगामी काळात शहरातील राजकीय गणिते बदलणार आहे.
इंदापूर शहरातील लोकसभा निवडणुकीसाठी २२ हजार ९२३ मतदार होते. त्यापैकी १४ हजार ७८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शहरामध्ये माजी मंत्री व आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह नगरसेवकांनी शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, २१ पैकी चार बूथ वगळता इतर सर्व बूथवर पिछाडी स्वीकारावी लागली.
जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांनी मोजक्याच पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवत सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचत मताधिक्य मिळवण्यात यशस्वी झाले.

इंदापूर शहरातील मतदानाची आकडेवारी
सुप्रिया सुळे यांना मिळालेली मते- ७८७१
सुनेत्रा पवार यांना मिळालेली मते- ५८३२
सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य- २०३९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com