

इंदापूर, ता. २४ ः एकीकडे शरद पवार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार, उत्तम जानकर यांच्या सभा घेऊन मोठी वातावरण निर्मिती केलेल्या राज्यातील मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधलेले दत्तात्रेय भरणे यांनी १९ हजार ४१० मतांनी विजय प्राप्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करताना व सांगता समारंभ अशा दोनच मोठ्या सभा घेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिवावर विजयश्री खेचून आणली. यात इंदापूर शहरासह जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी सहा गटांमध्ये मताधिक्य मिळवले तसेच पोस्टल मतांमध्येही भरणे यांना मिळालेले आघाडी ही लक्षणीय होती. दरम्यान भरणे यांची झालेली विजयाची हॅट्ट्रिक हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
इंदापूर विधानसभेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे ही लक्ष लागून राहिले होते. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर तत्काळ त्यांची महाविकास आघाडीमधून उमेदवारी जाहीर केली होती. दत्तात्रेय भरणे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर झाली होती. यामुळे शरद पवार व अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली होती. त्यातच महाविकास आघाडीमधून प्रवीण दशरथ माने यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज असलेल्या बड्या नेत्यांची समजूत काढून मूठ बांधण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी अनेक दुसऱ्या फळीतील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. मागील दहा वर्ष सत्तेपासून वंचित राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची साथ अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोडली. त्यामध्ये अप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, देवराज जाधव, वसंत मोहोळकर, अतुल व्यवहारे आदींसह हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूरसिंह पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची साथ देणे पसंत केले. या प्रमुख कारणांमुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. तर भरणे यांना प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, दशरथ डोंगरे, हनुमंत बंडगर, बाळासाहेब ढवळे यांच्यासह अन्य निष्ठावंत कार्यकर्त्यांची तसेच महायुतीमधील घटक पक्षांची ही साथ मिळाली, यामुळे भरणे यांचा विजय सुकर झाला.
जिल्हा परिषद गटनिहाय मिळालेली मते व आघाडी
जिल्हा परिषद गटाचे नाव - भरणे यांना मिळालेले मते - पाटील यांना मिळालेली मते - माने यांना मिळालेली मते - कोणाचे मताधिक्य
१) पळसदेव-बिजवडी - १६०३४ - १३०७२ - ७१६६ - २९६२ भरणे आघाडी
२) भिगवन - शेटफळगडे - १६१४४ - ११५८१ - ४७७६ - ४५६३ भरणे आघाडी
३) सणसर - लासुर्णे - १३११० - १३००६ - ४५०४ - १०४ भरणे आघाडी
४) कळस - वालचंदनगर - १८१६३ - ८६४० - २७८७ - ९५२३ भरणे आघाडी
५) निमगाव केतकी - निमसाखर - १७०१८ - १२४८५ - ४९०८ - ४५३३ भरणे आघाडी
६) काटी-वडापुरी - १४६०१ - १४३२४ - ५५२३ - २७७ भरणे आघाडी
७) बावडा-लाखेवाडी - १३५९९ - १६८१२ - ५६५२ - ३२१३ पाटील आघाडी
८) इंदापूर शहर - ७४४१ - ६९०३ - २४०२ - ५३८
९) पोस्टल मते - ११२६ - १००३ - १९९ - १२३
एकूण - ११७२३६ - ९७८२६ - ३७९१७ - १९४१० मतांनी भरणे
विजयी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.