शेंडकरवाडीचा पूल झाला ‘उंटाच्या पाठीसारखा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेंडकरवाडीचा पूल झाला ‘उंटाच्या पाठीसारखा’
शेंडकरवाडीचा पूल झाला ‘उंटाच्या पाठीसारखा’

शेंडकरवाडीचा पूल झाला ‘उंटाच्या पाठीसारखा’

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १९ ः नीरा डाव्या कालव्यावर शेंडकरवाडी (ता. बारामती) येथे नव्याने बांधत असलेला पूल गैरसोयीचा ठरणार आहे. आधीच जमिनीलगतच्या रस्त्यापासून कालव्याचा भराव भरपूर उंच असतो, अशात भरावाच्याही वर दोन मीटरपेक्षा अधिक उंचीचा पूल बांधला जात आहे! चक्क उंटाच्या पाठीसारखा पूल होणार असून, बैलगाडीच काय ट्रॅक्टरचीही ये-जा मुश्कील होणार आहे. प्रशासनात भरलेल्या तज्ज्ञांनी उंटावरून शेळ्या हाकल्याने हा प्रकार घडला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शेंडकरवाडी येथे १९२० मध्ये इंग्रजांनी नीरा डावा कालव्यावर दगडी पूल बांधला होता. शेंडकरवाडीसह करंजे, चौधरवाडी, मगरवाडी अशा गावांना हा पूल ओलांडूनच शेताकडे जावे लागते, तसेच नीरा-बारामती रस्त्यावरील गावांना शेंडकरवाडीमार्गे सोमेश्वर मंदिराला जाणे सोईस्कर ठरते. त्यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे पावणेदोन कोटी रुपये निधी मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) मुरब्बी तज्ज्ञांनी पुलाचे डिझाइन केले आणि पाटबंधारे विभागाने ना हरकत दिली. दोन महिन्यांच्या कामानंतर पूल जास्तच उंच झाल्याचे निदर्शनास आले. एका अधिकाऱ्याने पूल उंच होतोय, असा इशारा आधीच दिला मात्र तो धुडकावून लावला गेला. त्यानंतर ग्रामस्थांकडून अजित पवारांपर्यंत तक्रारी गेल्यावर त्यांनी ‘दोन्ही बाजूला उतार काढा’ असे आदेश दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने दिली.
-----------------------
इतिहासातील सर्वाधिक उंच पूल
नीरा डाव्या कालव्याच्या पश्चिमेला पूल उतरला की गाव सुरू होते, तेथे उतार काढायला संधी नाही. हलगर्जीपणामुळे पावणेदोन कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पीडब्लूडी पाटबंधारेकडे बोट दाखवत आहे, तर पाटबंधारेवाले पुलाखालून पाणी जाईल का हे पाहणे एवढेच आमचे काम असल्याचे सांगत आहेत. या गोंधळात कालव्याच्या इतिहासातील सर्वाधिक उंच पूल तयार होत आहे.
--------------------------
अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासातच घेतलेले नाही. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन शंका निरसन केले नाही, तर काम बंद पाडणार आहोत. - रूपचंद शेंडकर, माजी संचालक, सोमेश्वर कारखाना
-------------------------
पुण्या-मुंबईत असल्यासारखा उंच पूल केला आहे. येथील नागरिकांसाठी तो निरुपयोगी ठरणारा आहे. - श्यामराव शेंडकर, शेतकरी
---------------------------------
दोन्ही बाजूंनी उतार देऊन उंचीचा समतोल साधणार आहोत. गावाच्या बाजूलाही स्लोप बसतोय. आम्ही सुरवातीला नीट करत होतो, पण पाटबंधारे खात्यानेच कालवा नूतनीकरणामुळे एक मीटर वाढवायला सांगितले. अन्यथा एक मीटरने उंची कमी करता आली असती. - आर. एम. मुखेकर, अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग
-------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाने जे डिझाईन केले त्यानुसारच काम झालेले आहे. राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
---

---