
‘सोमेश्वर’ बिगरनोंदीचाही ऊस घेणार
सोमेश्वरनगर, ता. ७ : सोमेश्वर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने दैनंदिन गाळपक्षमता वाढविण्यात यश मिळविल्याने ऊसगाळप जोमाने होत आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या पंधरवड्यातच सर्व ऊस संपविण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे. गाळपासाठी जादा ऊस मिळावा म्हणून संचालक मंडळाने आता बिगरनोंदीचा ऊस गाळप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे अन्य कारखान्यांना कमी दरात ऊस देण्याची शेतकऱ्यांवर आलेली वेळ टळणार आहे.
सोमेश्वर कारखान्याने ८ लाख ५० हजार टन उसाचे गाळप केले असून, सहा लाख टन ऊस शिल्लक आहे. हंगामाच्या सुरवातीला पुरेशी ऊसतोड यंत्रणा न मिळाल्याने दैनंदिन गाळप साडेसात ते आठ हजार टनांनीच होत होते आणि मजुरांकडूनही पैशाची मागणी होत होती. हळूहळू गाळपाची यंत्रणा उपलब्ध केली. राज्यातील काही कारखान्यांचे गाळप रखडल्याने ‘सोमेश्वर’ला आता गरजेपेक्षा जास्त यंत्रणा मिळाली आहे. तर, हार्वेस्टरची संख्याही तेरावर गेली आहे. त्यामुळे आता दैनंदिन नऊ हजार टनांनी गाळप होत असल्याने हंगामास वेग आला आहे.
चालू महिन्याअखेर आडसाली उसाचे क्षेत्र संपणार आहे. त्यानंतर पूर्वहंगामी व सुरू हंगामी उसाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने त्या उसासोबत खोडव्याच्या तोडी सुरू होणार आहेत. सध्या जिरायती भागात ऑक्टोबरच्या लागवडींची तोड सुरू झाली आहे. तर, हार्वेस्टरद्वारे जानेवारीतील खोडव्याच्याही तोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित सहा लाख टन ऊस ६० ते ७० दिवसांत संपणार आहे.
‘सोमेश्वर’च्या संचालक मंडळाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद, बिगरसभासद आदींचा बिगरनोंदीचा ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शेतकऱ्यांना २४०० ते २७०० रुपये प्रतिटन दराने बाहेरच्या कारखान्यांना ऊस द्यावा लागत आहे. प्रतिटन तब्बल पाचशे ते सातशे रुपयांचा तोटा होत आहे. कारण, ‘सोमेश्वर’चा दर मागील चार-पाच हंगामात किमान ३००० रूपयांपेक्षा कमी नाही. यावर्षी साखरेचे दर चांगले मिळाल्याने मागील हंगामापेक्षा जादा दर मिळण्याची शक्यता असल्याने ‘सोमेश्वर’लाच ऊस देणे परवडणार आहे.
नोंद त्वरित करण्याचे आवाहन
‘‘सोमेश्वर कारखान्याने २८०० रुपये प्रतिटन एफआरपी एकरकमी देत आहे. शिवाय जिल्ह्यातील ११.२६ टक्के इतका सर्वाधिक साखर उतारा, साखरविक्रीची उत्तम सरासरीमुळे अंतिम ऊस दरही नेहमीप्रमाणे उत्तमच असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस ‘सोमेश्वर’लाच घालावा. बिगरनोंदीच्या उसाची गट कार्यालयात त्वरित नोंद करून घ्यावी. तारखेनुसार कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडून आणला जाईल. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व ऊस संपणार असून चौदा ते साडेचौदा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे,’’ असा दिलासा ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिला.