भक्तीमय वातावरणात रंगले अश्वरिंगण

भक्तीमय वातावरणात रंगले अश्वरिंगण

सोमेश्वरनगर, ता. २८ : टाळ-चिपळ्यांचा निनाद... मृदंगाचा गगनभेदी गजर आणि सोबतीला ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा टिपेला पोचलेला जयघोष, अशा भक्तीमय वातावरणात सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अश्वरिंगण पार पडले. भव्य मैदानावर वारकऱ्यांनी उभारलेल्या गोल रिंगणातून पालखीची प्रदक्षिणा झाली आणि पाठोपाठ अश्वांनी भरधाव फेऱ्या मारून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. विणेकरी, टाळकरी, तुळस डोईवर घेतलेल्या महिलांच्या फेरीनंतर दिंड्या पताका रिंगणभर धावल्या.
सोपानदेवांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी निंबूत-छप्री येथे न्याहारीसाठी पोचला. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, संचालक लक्ष्मण गोफणे, गौतम काकडे, अमर काकडे, शिवाजी लकडे, शिवाजी दगडे आदींनी स्वागत केले. येथील भाविकांनी वारकऱ्यांच्या नाश्त्याची सोय केली.
पालखी सोहळा दुपारी वाघळवाडीमधील अंबामाता मंदिरात भोजनासाठी थांबला. ग्रामपंचायतीने फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. सरपंच हेमंत गायकवाड व उपसरपंच गणेश जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी वीजकंपनीचे अधिकारी सचिन म्हेत्रे, अजिंक्य सावंत, जितेंद्र सकुंडे, विजय चव्हाण, अनिल शिंदे उपस्थित होते. वाघळवाडी येथील साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व तथास्तु आयसीयू हॉस्पिटलच्या वतीने मोफत औषधोपचार व फळवाटप केले. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी भोजन वारकऱ्यांना दिले. हरणाई माता मंडळाने पिठलं-भाकरीचा बेत केला.
दुपारी साडेतीन वाजता पालखी काकडे महाविद्यालयाच्या भव्य मैदानाकडे अश्वरिंगणासाठी पोचली. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, नीता फरांदे, सतीश सकुंडे, नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
रिंगणात हजारो वारकरी व स्थानिक भाविकांनी गोल रिंगण तयार केले. रिंगणाच्या कडेला टाळ-चिपळ्या घेतलेले वारकरी, भालदार, चोपदार उभे होते. लाखभर वारकरी आणि हजारो भाविकांचा ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष आसमंतात व्यापत होता. रिंगणातून सुरवातीला श्रीनाथ म्हस्कोबा खांदेकरी दिंडीचे मानकरी पालखी खांद्यावर घेऊन धावले. त्यानंतर अंजनगाव येथील अजित परकाळे, दिलीप परकाळे या मानकऱ्यांच्या तीन अश्वांनी भरधाव वेगाने तीन फेऱ्या मारल्या. यानंतर महिलादेखील डोईवर तुळस, विठ्ठलमूर्ती घेऊन बेभान धावल्या. टाळ-चिपळ्या व दिंड्यापताका घेतलेले वारकरी यांनीही रिंगणास प्रदक्षिणा मारल्या.
पालखी सायंकाळी सोमेश्वर कारखान्यावर मुक्कामासाठी पोचली. कारखान्याच्या उपाध्यक्ष प्रणिता खोमणे व डॉ. मनोज खोमणे या दांपत्याच्या हस्ते पादुकांना अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी सचिव कालिदास निकम, दीपक निंबाळकर आदी उपस्थित होते. कारखान्याने पाच हजार वारकऱ्यांच्या भोजनाची सोय केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com