जळीतग्रस्ताने पार केले भरपाई मिळविण्याचे दिव्य

जळीतग्रस्ताने पार केले भरपाई मिळविण्याचे दिव्य

सोमेश्वरनगर, ता. १३ : सोमेश्वर कारखान्याचे सभासद अशोक भानुदास खोमणे यांचा खोडवा ऊस दोन वर्षांपूर्वी महावितरण कंपनीच्या चुकीमुळे जळीत झाला होता. नुकसान भरपाई देताना कंपनीने शेतकऱ्याची दमछाक केली. मात्र शेतकऱ्यानेही दोन वर्षे न थकता पाठपुरावा केला आणि ८८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळविली. जळीतग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचे उदाहरण मार्गदर्शक ठरणार आहे.
कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील खोमणे यांचा दोन एकर खोडवा ऊस खांबावरील तारांच्या घर्षणातून उडालेल्या ठिणग्याने मार्च-२०२२ मध्ये ठिबक संच प्रणालीसह जळीत झाला. कृषी विभागच्या अहवालानुसार त्यांना कंपनीकडून ८८ हजारांची भरपाई देऊन न्याय मिळाला आहे. मात्र, दोन वर्षे संघर्ष करताना सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, कंपनीचे काही अधिकारी यांचे सहकार्य झाले. जळीत झाल्यावर वीज कंपनीच्या विद्युत निरीक्षकांचा अहवाल सगळ्यात महत्त्वाचा असतो. पण संबंधित निरीक्षकाने तपासणी करायला येण्यासाठी चक्क महिना लावला. तोवर शेतकरी पीक कसा ठेवणार? आणि वीज कर्मचारी तारा लोंबत्या कशा ठेवणार? त्या विलंबामुळे वीजकंपनीने सुरुवातीलाच प्रस्ताव फेटाळला आणि शेतकऱ्यालाच स्पष्टीकरण देता देता नाकी नऊ आले. दुसऱ्यांदा खोमणे यांच्या नावे वीजबिल बाकी आहे यावरून प्रस्तावात त्रुटी निघाली. सदर बिल आपले नसल्याचे खोमणे यांनी सिद्ध केले. भरपाईबाबत शेतकरी अजून अनभिज्ञ आहेत. यापूर्वी सोमेश्वरनगर उपविभागात केवळ आनंदराव टकले व सुभद्रा निंबाळकर यांनाच भरपाई मिळाली होती.

महावितरणकडून तीन वेळा कागदपत्रे परत आली. अनेकदा नको ती भरपाई असे वाटायचे. पण अनेकांच्या सहकार्यामुळे त्यामुळे पाठपुरावा सोडला नाही.
- अशोक खोमणे, ऊस उत्पादक


नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याने द्यायची कागदपत्रे
-अर्ज
-तलाठी पंचनामा
-तालुका कृषी अधिकाऱ्याचे पत्र (ऊस जळून व ठिबक जळून किती नुकसान झाले असा उल्लेख असणारे)
-कारखान्याचे पत्र (गट क्रमांक, क्षेत्र, गाळपाचे टनेज, उसाचा दर, जळीतामुळे केलेली कपात, अदा रक्कम अशा माहितीसह)
-जळीत वर्षासह मागील ३ वर्षांची ऊसबिले
-ठिबक संच खरेदी बिल
- तीन वर्षांची पीकपाहणी नोंदविलेला सातबारा
-शासकीय/निमशासकीय/खासगी व अन्य संस्थेकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, भविष्यात घेणार नाही. अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र

उपविभागीय कार्यालयाची कागदपत्रे
चेकलिस्ट, फॉर्म अ, फॉर्म नं. २, कार्यालयाची व उपविभागीय अधिकायांची टिप्पणी, शाखा अधिकाऱ्याचा व कर्मचाऱ्यााचा जबाब, स्केच, विद्युत निरीक्षकाचे पत्र.


03526

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com