सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यात एक लाखापेक्षा अधिक वारकरी

सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यात एक लाखापेक्षा अधिक वारकरी

सोमेश्वरनगर, ता. ८ : कोरोनानंतर संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिंड्यांची संख्या १०७ वर तर वारकऱ्यांची एकूण संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख अॅड. त्रिगुणमहाराज गोसावी यांनी दिली. तसेच, सासवडमधून पालखी प्रस्थानावेळी पोलिसांची अधिकची कुमक, वरीष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष देण्याची गरज आहे तसेच लासुर्णे ते नीरवांगी व लाखेवाडी ते सराटी या दुर्दशा झालेल्या अरुंद रस्त्यांची दुरूस्ती गरजेची आहे, अशा समस्याही मांडल्या.
सोमेश्वर कारखान्यावर संत सोपानकाका पालखी सोहळा मुक्कामी होता. यानिमित्ताने त्रिगुण महाराज यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, युवा कीर्तनकार निखीलमहाराज घाडगे, निखिलमहाराज कदम, आकाशमहाराज कामथे उपस्थित होते.
त्रिगुणमहाराज म्हणाले की, महाराष्ट्रात छोट्या-मोठ्या अडीचशे पालख्या आहेत. तुकोबा-ज्ञानोबा यांच्यानंतर सोपानकाकांसोबत खूप मोठा जनसमुदाय आहे. जंगल, नद्या, महापूर, ओढे, श्वापदे यांच्याशी संघर्ष करत संत अनुयायांनी पालखीसोहळा जपला. संत सोपानकाकांचा स्वतंत्रपणे पालखी सोहळा १२० वर्षांपूर्वी सुरू झाला. बैलगाडीतून सोहळा जायचा. कोरोनानंतर अन्य पालखीतले वारकरी तसेच नव्याने येणारे वारकरी सोपानकाका सोहळ्यात सहभागी होत असल्याने वारकऱ्यांची संख्या लाखाच्या वर गेली आहे. दररोज दिंडीचालक, चोपदार यांच्याशी बैठका होऊन नियोजन होते. पालखीत हौशे-नवशे नसल्याने सगळेच अत्यंत काटेकोर स्वयंशिस्त आणि वेळा पाळतात. कुठेही आमच्यासाठी वाहतूक बंद केली जात नाही.
प्रस्थानावेळी सासवडला ज्ञानोबांचा लाखोंचा सोहळा आलेला असतो त्यात सोपानकाकांचा एक लाखांचा सोहळा पुढे निघणार असतो. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी वगैरे सोपानकाका सोहळ्याकडे पाहणीसाठी येत नाहीत. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची कुमक अधिक हवी असते. पालिकेकडून, प्रशासनाकडूनही प्रस्थानाच्या तयारीसाठी मदतीची गरज आहे. शौचालयांची संख्या वाढविणे अत्यावश्यक आहे. पाणी, आरोग्य या सुविधा उत्तम आहेत. ठिकठिकाणी प्रशासन स्वागत करत आहे. सामाजिक संस्थांची मदत आहे.
तसेच सोपानकाकांच्या पालखीमार्गात पांगारे ते वीरमार्गे जेऊरपर्यंत अरूंद रस्ता आहे. इंदापूरमध्ये लासुर्णे ते नीरवांगी आणि लाखेवाडी ते सराटी या मार्गांची दुरवस्था आहे, असे त्यांनी मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com